युद्धामुळे प्लास्टिक पॅकेजिंग महागली file photo
छत्रपती संभाजीनगर

युद्धामुळे प्लास्टिक पॅकेजिंग महागली

विविध बॅगसह बॉटल, प्लेट, ग्लासच्या किमतीत तब्बल ५० टक्के वाढ

पुढारी वृत्तसेवा

Plastic packaging has become more expensive due to the war

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जागतिक पातळीवरील संघर्षांमुळे प्लास्टिक पॅकेजिंगच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मोठ्या उद्योगांसह शहरातील किरकोळ बाजारावरही युद्धाचा परिणाम झाल्याने पॉलीपॉपलीनसह किराणा बॅग, नॉन वोव्हन बॅग तसेच प्लास्टिक पिशव्या, बॉटल, ग्लास, प्लेट, प्लास्टिक डब्बे यांचेही दर तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.

दैनंदिन जीवनात प्लास्टिक पॅकेजिंग वस्तू प्रामुख्याने अन्नपदार्थ, विविध वस्तू आणि उत्पादनांचे रक्षण करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र, सध्या मध्यपूर्वेत भडकलेल्या युद्धामुळे प्लास्टिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल सुमारे ५० ते ६० टक्के पर्यंत महागला आहे. त्यामुळे पॉलिमरच्या दरात वाढ झाली असून, उत्पादक मोठ्या कंपन्यांनी पॉलिमर (पीपी, पीई, पीव्हीसी) च्या किंमती ५५ ते ६० टक्के वाढवल्या आहेत. परिणामी, पॅकेजिंग उद्योगांला फटका बसून प्लास्टिक पॅकेजिंगच्या वस्तूही महागल्या आहेत.

दैनंदिन व्यवहारात अनेकांना उपयोगी आणि वापरात येणाऱ्या विविध आकारातील प्लास्टिक पिशव्या, किराणा बॅग, पॉलिथिन पाऊच, नॉन वोव्हन बॅग यांसह प्लास्टिक बाटल्या, पॅकेजिंग बॅग, प्लास्टिक कोटेड पेपर ग्लास, सिल्व्हर कोटेड प्लेट, प्लास्टिक कंटेनर, प्लास्टिक रॅप्स यांच्या किंमती सुमारे २० ते ५० टक्क्यापर्यंत वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कंपन्यांनी ५५ टक्के किमती वाढवल्या युद्धामुळे कच्चा माल महागला आहे. त्यामुळे कंपन्यांही प्लास्टिक पॅकेजिंग वस्तूंच्या किंमती ५० ते ५५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यानंतरही माल मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे स्टॉक आहे, तो महाग मिळत असल्याने याचा फटका बसत आहे.
- प्रवीण काला, उद्योजक
पीपी, किराणा बॅगच्या किमती वाढल्या पॅकेजिंगच्या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. पॉलीपॉपलीन (पीपी) प्रतिकिलोचे दर १४० वरून २२० रुपयांवर गेले आहेत. किराणा बॅग किलोमागे ६० रुपये वाढून २०० रुपयांवर तर, नॉन वोव्हन बॅग १३० वरून १८० रुपये किलोपर्यंत महागली आहे.
- राहुल कलंत्री, व्यापारी, प्लास्टिक अॅण्ड डिस्पोजेबल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT