Pishor chemical-free jaggery  
छत्रपती संभाजीनगर

Pishor chemical-free jaggery demand Chhatrapati Sambhajinagar| पिशोरच्या गुळाची राज्यभरात गोडी

Pishor chemical-free jaggery demand Sambhajinagar- केमिकलविरहित पारंपरिक निर्मितीमुळे मागणीत वाढ; शेतकऱ्यांना आर्थिक बळ कारभारी हराळ

पुढारी वृत्तसेवा

पिशोर : अस्सल चव, नैसर्गिक सुगंध आणि पारंपरिक निर्मितीची खासियत यामुळे पिशोरच्या गुळाने आता राज्यभरातील ग्राहकांच्या पसंतीवर आपली मोहोर उमटवली आहे. कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या या गुळाला बाजारपेठेत मोठी मागणी वाढत असून, यंदा पिशोरच्या गुळाला प्रतिकिलो २० रुपये दर मिळत आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत गुळाचा वापर वाढत असल्याने पिशोर परिसरातील गुऱ्हाळांवर उत्पादनाची लगबग सुरू झाली आहे.

गुळाची चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पारंपरिक पद्धत हे पिशोरच्या गुळाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. चहा, ड्रायफ्रूट लाडू, गुळाची पोळी, वाघरं तसेच विविध पारंपरिक खाद्य पदार्थांमध्ये या गुळाचा वापर केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक हॉटेलांमध्ये गुळाच्या चहाला विशेष पसंती मिळत असून, ग्राहकांकडूनही नैसर्गिक गुळाची मागणी वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरसह जळगाव, जालना आणि परिसरातील विविध बाजारपेठांमध्ये पिशोरच्या गुळाची विक्री होत आहे.

पिशोर येथील गुऱ्हाळमालक बाळू वामन नवले यांनी सांगितले की, पिशोरमध्ये गुळनिर्मितीसाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. उसाचा ताजा रस काढून तो मोठ्या कढईत आटवला जातो. या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही. त्यामुळे गुळाचा नैसर्गिक रंग, स्वाद आणि सुगंध कायम राहतो. याच गुणवत्तेमुळे पिशोरच्या गुळाने बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गुऱ्हाळांमुळे मिळतोय स्थानिकांना रोजगार

पिशोर परिसरात सध्या साधारणतः १० ते १२ गुऱ्हाळे सुरू आहेत. एका कढईत म्हणजेच एका आधनात सुमारे १२ क्विंटल उसापासून १२० ते १४० किलो गुळ तयार होतो. प्रत्येक गुऱ्हाळावर साधारण १० ते ११ मजूर काम करतात. गुळनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर मजुरांचे कौशल्य महत्त्वाचे असते. विशेषतः गुळ तयार करण्याच्या प्रक्रियेत 'गुळ्या' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुशल कामगाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

शेतकऱ्यांसाठी गुऱ्हाळ व्यवसाय ठरतोय फायदेशीर

ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस थेट गुऱ्हाळांना विक्री करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर उसाची खरेदी-विक्री होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. साखर कारखान्यांऐवजी गुऱ्हाळांना ऊस देण्याकडे काही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गुळाला मिळणारा बाजारभाव, स्थानिक विक्रीची सुविधा आणि रोजगारनिर्मिती यामुळे गुऱ्हाळ व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT