Performing obscene acts with girls; teacher sentenced to five years of rigorous imprisonment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे आणि विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी ठोठावली. विजय सीताराम हिवाळे (५०, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) असे शिक्षकाचे नाव आहे.
प्रकरणात हडको येथील शाळेच्या मुख्याध्यापक यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, शिक्षक विजय हिवाळे हा प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी अ चा वर्गशिक्षक असून तो गणित विषय शिकवत होता. मात्र विजय हिवाळेबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक तोंडी तक्रारी येत होत्या.
त्यानंतर फिर्यादी यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ८ एप्रिल २०२३ रोजीच्या फुटेजमध्ये शिक्षक हिवाळे याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छडीने मारहाण केल्याचे, तसेच दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करताना दिसला. मुली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याचेही फुटेजमध्ये आढळून आले. याशिवाय, इयत्ता सातवीतील १३ वर्षीय विद्यार्थ्याला खाली पडेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थाचालकाला याबाबत माहिती दिली. त्यांनी स्वतः सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत तातडीने तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार १० जुलै २०२३ रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुलाोली यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी विजय हिवाळे याला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४(अ), पॉक्सो कायदा कलम ८ व १० अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.