

सिल्लोड : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २१) उमेदवारांची झुंबड उडाली. तर समर्थकांनीही मोठी गर्दी केल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. जिल्हा परिषदेसाठी ९८ तर पंचायत समितीसाठी १४८ असे एकूण २४६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
शेवटच्या दिवशी नव्याने निर्मिती झालेल्या अंभई गटातून आ. अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र अब्दुल आमेर यांनी अर्ज दाखल केला. तर डोंगरगाव गटातून भाजपकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांचे सुपूत्र राहुल पालोदकर यांना शेवटच्या दिवशी भाजपने चकवा देत उमेदवारी नाकारली. त्यांचे उमेदवारीचे शेवटपर्यंतच्या प्रयत्नाना यश आले नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. भराडी, डोंगरगाव गटात शेवटपर्यंत उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. उमेदवारी मिळवण्यासाठी शहरातील भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह ठाण मांडले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारीचे राजकीय नाट्य पाहायला मिळाले.
गट निहाय उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे- अजिंठा गट- १०, उंडणगाव- ६, शिवणा- ६, अंभई- १७, घाटनांद्रा- ११, डोंगरगाव- १२, भराडी- १७, अंधारी- ९ तर केऱ्हाळा गटात- १० असे एकूण ९८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
गण निहाय उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे- अजिंठा गण- ११, हळदा- ४, उंडणगाव- १४, हट्टी- ५, शिवणा- १४, पानवडोद बु. ८, अंभई- ५, केळगाव- ६, घाटनांद्रा- ६, आमठाणा- ८, डोंगरगाव- १३, पालोद- १२, भराडी- ८, धानोरा- १२, अंधारी- ७, बोरगाव सारवणी- ७ तर केऱ्हाळा गणात- ९, तर निल्लोड गणात- ७ असे एकूण १४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.