Paper Leak Case: Hatnur College Fined ₹1 Lakh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हतनूर येथील राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास बी. कॉम. पेपर लीक केल्याप्रकरणी एक लाखाचा दंड ठोठावण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे, अशी माहिती संचालक डॉ.बी.एन. डोळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची ऑनलाईन बैठक बुधवारी (दि.२७) झाली. मा. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीस प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, सदस्य सचिव डॉ.बी.एन. डोळे यांच्यासह १३ सदस्य सहभागी झाले. बैठकीत एकूण आठ प्रस्तावर चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.
विविध प्रस्तावाला मंजुरी
या बैठकीत बी. कॉमची प्रश्नपत्रिका ११ एप्रिल रोजी लिक झाली होती. या प्रकरणी कन्नड तालुक्यातील हातनूर येथील राष्ट्रीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास एक लाखांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या परीक्षा केंद्रावरील बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक अस्लम जब्बू शेख यांच्यावर पुढील कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
परीक्षेसाठी देण्यात येत असलेल्या मानधनात १५ टक्के वाढ करण्यात आली. विधि, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका मुल्यमापनासाठी सध्या सुरु असलेल्या ऑनस्क्रिन मार्निंग सिस्टीम पध्दतीची व्याप्ती वाढवून पदवी, पदव्यूत्तरच्याही उत्तरपत्रिका मूल्यमापनद्वारे करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
याचबरोबर पीएचडी युनिटच्या कामात गतिमानता आणण्यासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. गुरुवर्य आर. जी. शिंदे विधी महाविद्यालय, धाराशिव येथील प्रा. पुष्पांजली चांगदेव शिंदे यांनी उत्तरपत्रिका मूल्यमापन करतांना चूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे.