Panchayat Samiti and Zilla Parishad elections Khultabad taluka
सुनील मरकड
खुलातबाद, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या सहा गणसाठी व जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली, तरीही ग्रामीण भागात निवडणूक सराव, रणनीती, जत्रा-धर्मस्थळे, बाजारपेठा आणि साप्ताहिक बाजारात जोरदार चर्चासत्रे सुरू झाली आहेत. प्रत्येक गावी इच्छुक उमेदवारांकडून 'मी तयार आहे अशी घोषणा करत संघटनांची उभारणी, पक्षांतर्गत गाठीभेटी, आणि पुतळे चौकात अनौपचारिक शक्तीप्रदर्शन घडताना दिसत आहे. घडताना दिसत आहे.
तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबतच स्वतंत्र उमेदवारही या वेळी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा परिणाम ग्रामीण मतदारांच्या मनोवृत्तीवर होणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.
भावी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य
प्रत्यक्ष जनतेत प्रचाराचा सराव करताना दिसत आहे. गावोगावी सुरू झालेल्या अनौपचारिक प्रचारात उमेदवार मदारात दारातफ जाऊन अभिवादन करत आहेत. काही ठिकाणी चहापान, बैठक, कार्यकर्त्यांसह तरुणांच्या वर्तुळात मीटिंग, व्यापाऱ्यांसोबत संवाद अशा कार्यक्रमांना वेग आला आहे. महिला बचतगट, शेतकरी संघ, युवक मंडळ, मंदिर समित्या, विविध सहकारी संस्था याठिकाणी इच्छुक उमेदवार आपली उपस्थिती नोंदवत आहेत.
समारंभ, लग्न सोहळे, समाजभोजन हे उमेदवारांसाठी जणू प्रचाराचे मैदान बनले आहेत. फक्त घोषणा नको.. काम हवे, असे स्पष्ट शब्दांत मतदार उमेदवारांना सूचना देताना दिसत आहेत. नगरपालिकेचा अलीकडील निकाल हा अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. मतदारांनी शहरात ज्या पद्धतीने मतदान केले, त्याचा प्रतिध्वनी ग्रामपातळीवर ऐकू येईल का? यावर प्रत्येकीचे वेगळे विश्लेषण आहे. काहींच्या मते, शहरातील निकाल हा सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोषाचे चिन्ह आहे. तर काहींचे म्हणणे, ग्रामीण प्रश्न आणि शहरातील प्रश्न वेगळे असतात, दोन्हींची मानसिकता बदललेली असते. मात्र एक गट मात्र ठामपणे सांगतो की, राजकीय वातावरणाची हवा या निकालामुळे नक्कीच बदलली आहे.
परंतु नगरपालिकेत जे घडले ते पंचायत समितीत होईलच असे नाही, पण काहींची पाया खालची माती सरकली आहे... आणि काहींचा आत्मविश्वास वाढला आहे. राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून तालुक्यातील तरुण मतदार हा निवडणुकीचा कळीचा घटक ठरणार आहे.
पक्षांतर्गत गटबाजी आणि सामंजस्याचे राजकारण प्रत्येक पक्षात संभाव्य उमेदवारांची संख्या मोठी असून, त्या तुलनेत निवडणूक क्षेत्र कमी आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात नाराजी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही गावांत तर सत्ताधारी पक्षातील इच्छुक एकमेकांचे पाय ओढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण परिस्थिती पाहता, तालुक्यातील येणारी निवडणूक बहुकोनी, अढळ आणि सम-साम्याची असेल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. नगरपालिका निकालात दिसणारी हवा ग्रामीण भागातही झुळूक निर्माण करेल, परंतु गाव पातळीवरील साखळ्या, स्थानिक मनधरणी आणि वैयक्तिक संपर्क हेच शेवटची बाजी फिरवणारे ठरणार आहेत. मतदार सजग आहेत, उमेदवार सज्ज आहेत... आता केवळ निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा लागून आहे.
व्यक्तिमत्त्वापेक्षा कामगिरी ठरणार सरस ?
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न होता राजकीय रंगत वाढली आहे, यावरूनच पुढील काही दिवसांमध्ये तालुक्याचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही संस्थांचा स्थानिक विकासात मोठा वाटा असल्याने या निवडणुका व्यक्तिमत्त्वापेक्षा कामगिरी आणि विश्वासावर होणार अशी अपेक्षा आहे. शहरातील निकालामुळे आत्मविश्वास वाढलेले काही पक्ष आता ग्रामीण भागात मोर्चेबांधणी करत आहेत, अनुभवी नेते विरुद्ध नव्या पिढीतील नेतृत्व, हे समीकरणही अनेक ठिकाणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.