"धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेशाची सुटली गोठी"
शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज व श्रीसंत भगवान बाबा यांचा शुक्रवारी (दि.१०) वारकरी परंपरेप्रमाणे "संतभेट" सोहळा भगवान गडाच्या पवित्र भूमीत पार पडणारा आहे. सोहळ्याचे पहिले रिंगण मिडसागंवी या पंचक्रोशीत संपन्न होणार असल्याने परिसरातील भाविक भक्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. पालखी पादुका सोहळा तिसरा मुक्कामासाठी कुंडल पारगाव नगरीत दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी पायघड्या टाकून सोहळ्याचे स्वागत केले आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.. हादगाव मुक्कामानंतर सकाळी सोहळ्याचे प्रस्थान होऊन दुपारी बोधेगाव येथे आगमन झाले. यावेळी वाजत गाजत नाथांच्या पादुकाची भव्य मिरवणूक काढून बोधेगाव येथील गावकऱ्यांनी आलेल्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.
दुपारनंतर बालमटाकळी, बाडगव्हाण, लाडजळगाव मार्गे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंडल पारगाव येथे तिसऱ्या मुक्कामासाठी दाखल झाला. "भानुदास एकनाथ" जयघोषात मिडसागंवी येथे पहिले रिंगण आगमन झाल्यावर परिसर दुमदुमून गेला होते.
यावेळी कुंडल पारगाव चे सरपंच अमृता धनंजय गरकळ, उपसरपंच बबन एकनाथ गरकळ, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब गरकळ, पोलिस पाटील बली सुनील ढोले यांनी नाथाच्या पादुकांचे पूजन करून पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्यासह आलेल्या वारकऱ्यांची स्वागत केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात ग्रामस्थांनी पालखीचे पायघड्या टाकून भव्य-दिव्य स्वागत केले.
मिडसागंवी येथे पहिले रिंगण
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण शुक्रवारी मिडसागंवी (ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर) या पंचक्रोशीत आयोजित केले जाते. या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, अड. योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
रिंगण सोहळ्यात सहभाग असलेल्या गंगाराम महाराज राऊत, रखमाजी महाराज नवले, तळपे महाराज, उगले महाराज, खैरमोडे महाराज, ऋषी महाराज नवले बबन महाराज बोरकर, भवर महाराज यांच्यासह चाळीस दिंडीतील महाराज मंडळी सहभाग घेऊन पालखी मार्गावरील थकवा या रिंगणातून दूर करून आनंद घेतात. रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यामुळे गावाला जत्राचे स्वरूप प्राप्त होते.