Nathsagar dam water release
पैठण : तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. आधीच घरात व शेतात पाणी साचलेले असताना नव्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कायमस्वरूपी पाणी निचरा करण्याची उपाययोजना न झाल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत व धरण उपअभियंता मंगेश शेलार यांच्या उपस्थितीत नाथसागर धरणाचे १८ दरवाजे चार फूट उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात तब्बल ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता असल्याने विसर्गात आणखी वाढ होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तहसीलदार ज्योती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा तालुक्यातील विविध महसूल मंडळांत आतापर्यंत ७५७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होते; मात्र रविवारी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे सर्वेक्षणाची गती मंदावली.
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार, कंपनी कामगार, वीटभट्टी व बांधकाम मजूर यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक व शेतकरी वर्गातून प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.