Paithan Sugarcane News
पैठण, पुढारी वृत्तसेवा : यंदा जोरदार झालेला परतीचा पाऊस त्यानंतर हवामानातील कमालीचा होत असलेला बदल याला कारणीभूत ऊस गाळप हंगाम उशिरा सुरू होण्यास झाला. यावर्षी कधी नव्हे उसाचा गाळप हंगाम सुमारे दीड महिने पुढे ढकलल्या गेल्याने कारखाना चालकांचे नियोजन कोलमोडले. यामुळे तोडणी सुरू होण्याआधीच तालुक्यातील काही भागांत उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कमी होणाऱ्या उत्पादनामुळे लागवड, खते, मोलमजुरी यांचा ताळमेळ कसा लागणार, यातच शेतकऱ्यांचे अंदाज-पत्रकच कोलमडणार आहे. यंदा सुरुवातीला पावसाने महिनाभर ओढ दिली. त्यामुळे यंदापण भीषण दुष्काळ पडतो की, काय असे वाटत होते. त्यानंतर पावसाळ्याला चांगली सुरुवात झाली. परतीच्या पावसाने तर सगळीकडे पाणीच पाणी झाले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील ओलावा कमी झाला नव्हता. या कारणास्तव यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर पडला गेल. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या उसाला सध्या तुरे फुटल्याने यंदा उसाचे वजनही घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे ज्यांच्या उसांना अवेळी तुरे आली. अशा ऊस उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. यंदा उसाची लावणीदेखील लांबल्यामुळे पुढील गळीत हंगामाच्या पूर्व नियोजनावर याचा परिणाम होणार असून ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे.
उसाची मुबलकता नसल्याने यंदाचा साखर हंगामही उसाच्या नुकसानीमुळे दीड दोन महिन्यांपर्यंतच चालणार असल्याचे चिन्हे दिसून येते. त्यामुळे तोडणी मजुरांनी कारखान्यांकडून घेतलेली अॅडव्हान्स रक्कम कशी फिटणार, असा प्रश्न मजूर तसेच ऊस वाहतूकदारांना पडला आहे. तुरे फुटलेल्या ऊस पिकांना तत्काळ तोडी देऊन साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाची उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
कारखान्यांमध्ये चढाओढ
पैठण तालुक्यातील नाथसागर धरणाच्या पायथ्याशी ओलिताखाली येणारा गंथडी भागातील बहुचर्चित असलेला मुबलक ऊस आपल्या कारखान्याकडे वळवण्यासाठी कारखानदारांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येते. शिवाय उसाची पळवापळवी सुध्दा सुरू झाली. यावर्षी उसाची कमतरता असल्याने कारखान्याचा धुरळा लवकरच विझणार आहे. त्यामुळे ऊसतोडी टोळ्या लवकरच घराची वाट धरणार असून तसेच कारखान्यावर अवलंबून असलेले लहान मोठे व्यावसायिकाला याचा फटका बसणार आहे.