पैठण : पैठण शहरात मंगळवारी (दि.२) रात्री इंदिरानगर भागातील अल्पवयीन मुलगा अनमोल देविदास आहिरे याचा प्राणघातक शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलाचे वडील देविदास शशीकांत आहिरे (रा. इंदिरानगर, पैठण) यांच्या फिर्यादीवरून खून करणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याचे वडील व नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री एक वाजता पैठण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलगा व त्याच्या वडिलास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे हे फरार असल्यामुळे मृत मुलाच्या नातेवाइकांनी बुधवारी सकाळी दहा वाजेपासून पैठण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दुपारी तपास अधिकारी डीवायएसपी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तीन तासांत नगर सेवक आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रात्री सात वाजेपर्यंत दगडेला पोलिसांनी अटक न केल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रात्री पैठण पोलिस ठाण्यात महिलांसह आंदोलन सुरू केले. जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, या निर्णयावर संतप्त नातेवाईक ठाम राहिल्यामुळे पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला होता. सदरील प्रकरणामुळे पोलिसांची मोठी दमछाक झाली होती.
ठिय्या आंदोलन सुरूच राहिल्याने मृत मुलाच्या नातेवाइकांची रात्री ९.३० वाजेदरम्यान तपास अधिकारी डीवायएसपी सुनील पाटील यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि चंद्रकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी समजूत काढली.
फरार आर-ोपीला कुठल्याही परिस्थितीत अटक करण्यात येईल. मृत मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासन सेवेत सामावून घेण्यासाठी पोलिस प्रशासन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तब्बल २५ तासांचे ठिय्या आंदोलन समाप्त करून नातेवाअकांनी मृतदेह ताब्यात घेण्याची संमती दर्शवली आहे.
तीन दिवसांची कोठडी
सदरील प्रकरणात पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला व त्याचे वडील या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, तर अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात पाठवले.