Kosari Double Murder Case : साक्ष द्यायला निघाला... अन्‌‍ जिवाला मुकला

कोसारी दुहेरी खून प्रकरणातील साक्षीदाराचा खून
Kosari Double Murder Case
दादासाहेब यमगर
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कोसारी (ता. जत) येथील गाजलेल्या दुहेरी खून-खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर यांचे अपहरण करून त्यांचा थंड डोक्याने खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. न्यायालयात साक्ष देण्यासाठी निघालेल्या दादासाहेब यांना भरदिवसा उचलले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह कर्नाटकातील मदभावी परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता.

सुरुवातीला आत्महत्येचा आभास निर्माण केला होता, मात्र विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यापासून साध्या पोलिस शिपायापर्यंत पोलिस दल कामाला लागले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत, हा गळफास नसून नियोजित हत्या असल्याचे उघड केले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे, तर आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

मंगळवारी सकाळी दादासाहेब यमगर, फिर्यादी प्रवीण यमगर आणि यशवंत खटके सांगली जिल्हा सत्रन्यायालयात साक्ष देण्यासाठी निघाले होते. नागज फाटा येथे दादासाहेब यांनी, मी पेट्रोल टाकून येतो, असे सांगत ते दुचाकीवरून गेले. काही मिनिटांत त्यांनी प्रवीण यमगर यांना फोन करून, पैसे घरी विसरल्याचे सांगत त्यांच्याकडे पैसे मागितले. दादासाहेब पैसे घेण्यास येत असताना चारचाकीतून आलेल्या टोळक्याने त्यांना जबरदस्तीने वाहनात कोंबले. संशयित आरोपींपैकी एकाने त्यांची दुचाकी ताब्यात घेतली आणि संपूर्ण टोळी तिथून पसार झाली.

दादासाहेब बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. कवठेमहांकाळ पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याचदिवशी बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला आणि सीमाभाग हादरून गेला. दादासाहेब यांच्या मृतदेहाजवळ त्यांची मोटरसायकल उभी होती.

जेलमध्ये सुपारी घेऊन संपवला साक्षीदार

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा आणि दादासाहेब यमगर यांचा थेट कोणताही संबंध नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अपहरण आणि खून प्रकरण सुपारी किलिंग असल्याचा संशय आहे. कोसारी दुहेरी खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या अटकेतील संशयित यांची ओळख कारागृहात असतानाच झाली होती. त्याच काळात साक्षीदार दादासाहेब यमगर यांचा काटा काढण्याची सुपारी दिल्याची माहिती मिळाली.

साक्ष दिली तर संपवले जाईल का?

आरोपींनी अपहरण करून मंगळवारी रात्री उशिरा दादासाहेब यांना जबरदस्तीने गळफास लावला आणि नंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह झाडाला टांगल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खटल्यातील साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, साक्ष दिली तर संपवले जाईल का? अशी भीती साक्षीदारांना वाटू लागली आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक रात्री उशिरा पोलिस ठाण्यात

घटनेची विशेष दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी बुधवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. तब्बल तासभर पोलिस ठाण्यात थांबून त्यांनी तपासाचा आढावा घेतला. तपास वेगाने आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना देत मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news