Jayakwadi Dam Water Storage  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam | जायकवाडी धरणात ७१.२५ टक्के पाणीसाठा; खरीप सिंचनासाठी कालव्यांतून आवर्तन सुरू

धरणात ५७,४६३ क्युसेक पाण्याची आवक; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Jayakwadi Dam Water Storage

पैठण : गोदावरीच्या वरच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ७१.२५ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणात ५७ हजार ४६३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती.

यंदा धरणात समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना सिंचनासाठी डावा व उजवा कालवा सुरू करून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खरीप हंगाम २०२६-२७ साठी नियमानुसार कालव्यांतून पाणी सोडण्याचे आदेश संबंधित पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

त्यानुसार पैठण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी डावा व उजवा कालवा सुरू करून लाभक्षेत्रातील पैठण, अंबड, घनसावंगी, परतुर, गेवराई तसेच माजलगाव परिसरातील शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी केले आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी सिंचन व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत.

पाण्याची आवक वाढण्याची शक्यता; ८५ टक्के साठ्यानंतर विसर्गाचा निर्णय अपेक्षित

गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे शुक्रवारी धरणात आणखी वेगाने पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर गोदावरी नदीपात्रात नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT