Makar Sankranti Paithan latest news
पैठण : नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांत व एकादशी निमित्त पैठण येथे भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. हजारो महिला भाविकांनी “भानुदास एकनाथ” या जयघोषात श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरणी तिळगुळाचा वाण अर्पण करत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.
हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षीप्रमाणे बुधवारी (दि. १४) विविध गावांतून महिला भाविक पहाटेपासूनच पैठणकडे रवाना झाल्या. मिळेल त्या वाहनातून येत त्यांनी पवित्र गोदावरी नदीत स्नान करून सूर्यदेवतेचे पूजन व वंदन केले. त्यानंतर श्रीसंत एकनाथ महाराज मंदिरात दर्शन घेत तिळगुळाचा वाण अर्पण केला. मंदिर परिसरात फुगड्या खेळत, हळदी-कुंकू लावत आणि तिळगुळ वाटप करत महिलांनी एकमेकींना मकर संक्रांत व एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
महिला भाविकांच्या दर्शन व व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे व कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष व्यवस्था केली होती. मकर संक्रांत, एकादशी पर्व तसेच संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाथांच्या समाधी मंदिरात नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले व योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली होती.
दरम्यान, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.