पैठण, पुढारी वृत्तसेवाः पैठण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास केल्याची घटना घडल्या. यासंदर्भात पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दि. २९ रोजी अंतिम असल्याने पैठण निवडणूक विभागात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी गेली होती. यासह महायुतीचे उमेदवार बिलास बापू भुमरे यांनी पैठण शहरात भव्य रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले.
यावेळी महायुती घटक पक्षाचे तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभाग झाले होते. या रॅलीमध्ये अज्ञात चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास केल्याच्या घटना घडल्या यासंदर्भात पैठण पोलीस ठाण्यात बांधकाम व्यवसाय कुणालसिंग राजपूत (रा. सराफनगर पैठण) यांनी तक्रार देऊन गळ्यातील सोन्याची चैन ३५.२२ ग्रॅम वजनाची किंमत २ लाख १० हजार रुपयाची चैन लंपास झाल्याची तक्रार दाखल केली.
यासह राजेंद्र गोविंद भामरे (रा. बालाजीनगर छत्रपती संभाजीनगर) यांच्या देखील सहा तोळ्याची छत्रपती शिवाजी महाराज पदक असलेली सोन्याची चैन व बळीराम बाबुराव भुमरे (रा. पाचोड ) यांची दीड तोळ्याची सोन्याची चैन, गणेश सुंदरसिंग बुंदिले (रा. परदेशी पैठण) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन यासह खासदार संदिपान भुमरे यांचे पीए नामदेव खरात यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे लॉकेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले,
रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर यांच्या देखील गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास केल्याची घटना घडली. सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करून परिसरात चोरट्याचा शोध सुरू केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मदने हे करीत आहेत.