Paithan Ashadhi Wari Shri Sant Eknath Maharaj Palkhi
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पंढरीनगरीकडे निघालेला शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि.२३) दुपारी विचनवाडी, खाल्यावाडी सांगळवाडीमार्गे सायंकाळी मुक्कामासाठी रायमोह येथील पंचक्रोशीत आगमन होताच सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांचे मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले. यावेळी रायमोह दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे पंचक्रोशीला जत्रेचे स्वरूप आले होते. तत्पूर्वी, वारकऱ्यांनी बीड जिल्ह्यातील राक्षसभवन तांबे येथे मुक्काम केला.
सोमवारी सकाळी हजारो वारकरी भानुदास एकनाथांच्या जय घोषात मार्गस्थ झाले होते. पालखी मार्गावर रांगोळी काढून नाथांच्या पवित्र पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नाथांच्या पादुकांचे पूजन रायमोह सरपंच सुभाष क्षीरसागर, उपसरपंच सकाराम जाधव, पं. स. सदस्य जालिंदर सानप व गावातील विविध मान्यवर नागरिकांनी केले.
पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्यासह सोहळ्यातील गंगाराम महाराज राऊत, बबन महाराज बोरकर, उगले माहाराज, ऋषिकेश नवले महाराज, जाधव महाराज, ऋषिकेश महाराज रंधे, बोबडे महाराज, लोखंडे महाराज, नेरूळकर महाराज, केदार महाराज शास्त्री यांचे फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केले. रायमोह पंचक्रोशीला मारुती मंदिरात पादुका पालखीचा मुक्कामासाठी विसावा करण्यात आला. यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, गेल्या चारशे वर्षांपासून नाथांचा पालखी सोहळा पंढरीच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. या सोहळ्याच्या पालखी मार्गावर रायमोह मुक्काम पूर्ण झाल्यावर कैदकेवस्ती, हाटकरवाडी, मेहेंदरवाडी (ता. शिरूर कासार जि.बीड) या ठिकाणी पालखी सोहळा मार्गस्थ होतो.
पालखीचे गावात आगमन होताच बाहेरगावी, परराज्यात वास्तव्यास असलेले येथील नागरिक, तरुण या काळात गावात दर्शनासाठी मुद्दामहून येतात. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेनुसार या भागातील तरुण भाविक उपास करून नाथांच्या पवित्र पादुका व सोहळ्याचे मानकरी नाथवंशज यांना विना बैलाच्या गाडीत बसवून बैलगाडी ओढून डोंगराचा खडतर मार्गाचा गारमाथा टप्पा पूर्ण करतात. नाथांच्या पवित्र पादुका पालखी गारमाथा चौकातील विसाव्याच्या ठिकाणी आल्यावर नाथा महाराजांच्या पादुकांसमोर नतमस्तक होऊन आपला नवस पूर्ण करतात.
निसर्गरम्य वातावरणातील गारमाथा येथील सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात. अनेक वर्षांपासून सुरू अस लेली परंपरा आजही सोहळ्यातील वारकऱ्यांनी टिकून ठेवली आहे. श्रीसंत एकनाथ महाराज सोहळ्याचा मंगळवारी (दि. २४) सातवा मुक्कामासाठी पाटोदा येथे दाखल होणार आहे.