

District Collector reaches farmers farm
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांचे शंका समाधान, बी-बियाणे, खते त्याचप्रमाणे पीक कर्ज प्रक्रिया, शेतरस्ता, इत्यादी तक्रारी-वरील शंका, समाधान करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी (दि.२२) स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुक्यातील नांदगाव आणि घायगाव येथून केली. यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात, शिवारात आणि थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीचे शंका समाधान आणि निराकरण केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमा विषयी नियोजनासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी गावनिहाय होणाऱ्या भेटीचे नियोजन व त्याचे अहवाल याचे सादरीकरण जिल्हास्तरावर करण्याबाबतही निर्देशित केले आहे.
तसेच सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत विविध विभागाचे अधिकारी, शेतकऱ्यांच्या गावात, शिवारात आणि बांधावर जाऊन भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यामध्ये महसूल,ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा, मालकी हक्क, फेरफार, खत, बी बियाणांची उपलब्धता याविपयी संवाद साधला जाणार आहे. यामध्ये महसूल, कृपी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख, वन विभाग विभागाचे सर्व अधिकारी तालुका निहाय नियोजन करून किमान प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी भेटी देणार असल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी सांगितले.