पैठण : पैठण तालुक्यातील आनंदपूर शिवारातील शेतामधील रस्ता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक महिलेला पैठण तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि.१६) उपोषण करण्याची वेळ आली होती. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
आनंदपूर शिवारातील शेती गट क्रमांक ११८ यामध्ये प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता वयोवृद्ध महिला स्वातंत्र्यसैनिक मुक्ताबाई आप्पासाहेब निवारे रायांच्या शेतीतून रहदारीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला. सदरील आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी यापूर्वी निवेदनद्वारे करण्यात आलेली होती.
प्रशासनाने कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी तहसील विभागाकडे नकाशा प्रमाणे अथवा सामाईक बांधावरून रस्ता निर्माण करून देण्याची मागणी ही केली. या मागणीसंदर्भात वरिष्ठांकडे अपील देखील दाखल करण्यात आलेले आहे. पैठण तहसील कार्यालयासमोर त्यांनी मंगळवारी सकाळी उपोषण सुरू केले होते.
सायंकाळी उपोषणकर्ते मुक्ताबाई आप्पासाहेब निवारे व अनिल निवारे यांना नायब तहसीलदार सतीश पेंडसे, तलाठी श्रीराम केंद्रे यांनी तत्काळ कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर सदरील उपोषण स्थगित करण्यात आले आहे.