

छत्रपती संभाजीनगर : शहराचे महापौर, उपमहापौर, सभापती, विरोधी पक्षनेता व इतर सभापतींसाठी वाहनाला लागणाऱ्या इंधन खर्चाच्या मंजुरीसाठी यांत्रिकी विभागामार्फत मंगळवारी (दि.१८) स्थायी समितीच्या बैठकीसमोर ऐनवेळी प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावात पेट्रोल-डिझेल सह ईव्ही वाहनासाठी महापौरांना ७६ हजार रुपये तर उपमहापौर, सभापती यांच्यासाठी ५५ हजार रुपये खर्च असल्याचे मांडण्यात आले. मात्र सभापती अनिल मकरिये यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत पुढच्या सभेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहात मंगळवारी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत यांत्रिकी विभागामार्फत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, प्रभाग समिती सभापती, विशेष समिती सभापती यांना वाहनासाठी दरमहा प्रतिपूर्ती रक्कम देण्यासाठी ऐनवेळचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
या प्रस्तावात पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे महापौर यांच्या पेट्रोल वाहनासाठी ८३ हजार रुपये, डिझेल वाहनासाठी ८५ हजार रुपये तर ईव्ही वाहनासाठी ७६ हजार रुपये प्रतिपूर्ती (भत्ता) तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्या पेट्रोल, डिझेल वाहनांसाठी प्रत्येकी ६२ हजार व ६४ हजार रुपये आणि ईव्ही वाहनांसाठी प्रत्येकी ५५ हजार रुपये भत्ता देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात वाहनचालकाचा पगार आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही लावण्यात आला.
हा प्रस्ताव समोर येताच नगरसेवकांनी ईव्ही वाहनावर एवढा खर्च होतो का असा सवाल केला. तसेच ईव्ही वाहनासाठी प्रतिपूर्ती देण्याची आवश्यकता नाही, असे नगरसेवकांनी सांगताच सभापती अनिल मकरिये यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत पुढच्या समेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
इंधनदरात १४ वर्षांतील वाढ
सन २०१२ मध्ये ही प्रतिपूर्ती मंजूर झाली तेव्हा पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७५.१२, डिझेलचे दर ४७,०१, वाहन विमा १,३७०, चालकाचे वेतन ९,४९० आणि दुरुस्ती-देखभाल ६,५०० इतकी होती. त्यानंतरच्या १४ वर्षांत ही रक्कम जवळपास दुपटीने वाढली. त्या काळात महापौरांना पेट्रोल वाहनासाठी ४६,५०० व डिझेलसाठी ४०,५०० मिळत होते. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व विरोधी पक्षनेत्यांना पेट्रोल वाहनासाठी ३७,००० व डिझेलसाठी ३१,००० मिळत होते. आज मात्र ही रक्कम वाढून अनुक्रमे ८३ हजार व ८५ हजार इतकी झाली आहे.