आगीने गोदामाला कवेत घेतले होते. अग्निशमनच्या जवानांनी पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविले. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar fire : पगारिया ऑटोमोबाईल्सच्या गोदामाला भीषण आग

कचऱ्याच्या ठिणगीने ४ एकरच्या परिसरात रौद्र रूप : तब्बल ९० मिनिटांच्या शर्थीनंतर नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवरील गोलवाडी शिवारात असलेल्या पगारिया ऑटोमोबाईल्सच्या गोदामाला मंगळवारी (दि. २४) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामाच्या मागील बाजूस अज्ञाताने पेटवलेल्या कचऱ्याची ठिणगी उडाल्याने ही दुर्घटना घडली. या आगीत गोदामातील अॅक्सेसरीज शेडसह ५ ते ६ नवीन रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले. तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

गोलवाडी परिसरात पगारिया ऑटोमोबाईल्सचे सुमारे ४ एकरवर मोठे गोडाऊन आहे. या ठिकाणी चारचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांने ठेवली जातात. मंगळवारी दुपारी गोदामाच्या पाठीमागील बाजूस कोणीतरी कचरा पेटवला होता. वाऱ्यामुळे या कचऱ्याची ठिणगी थेट अॅक्सेसरीज साठवलेल्या शेडमध्ये पडली आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.

शेडच्या समोरच उभ्या असलेल्या नवीन एलपीजी रिक्षांपैकी ५ ते ६ रिक्षांना आगीची झळ बसली. घटनेची माहिती मिळताच महानपालिकेचे ८ आणि एमआयडीसीचे २ अशा एकूण १० बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ९० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दीड तास आग धुमसली

घटनेचे गांभीर्य ओळखून मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आगीच्या कारणांबाबत माध्यमांना माहिती दिली. तसेच माजी महापौर नंदकुमार घोडेले, मोहित त्रिवेदी यांनीही मदतकार्यात सहभाग नोंदवला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची धाव

मनपाचे ८, एमआयडीसीचे २ बंब आणि ६ पाण्याचे टँकर, जेसीबी घटनास्थळी. अॅक्सेसरीज शेडमधील साहित्य आणि ५-६ रिक्षांचे नुकसान, दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश; जीवितहानी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT