Crime News : पोटच्या गोळ्याचा १ लाख २० हजारांत सौदा ; 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जन्मदात्यांचा प्रताप file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पोटच्या गोळ्याचा १ लाख २० हजारांत सौदा ; 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या जन्मदात्यांचा प्रताप

आई-वडिलांसह चौघांवर गुन्हा; आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

Own child sold for Rs 1 lakh 20 thousand; The actions of the birth parents who live in 'live-in'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आपल्या पहिल्या जोडीदारांना सोडून 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये एकत्र राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला आर्थिक गरजेपोटी १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचा संतापजनक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी बाळ खरेदी करणारी आरोपी सीमा अनिल रेशवाल आणि या सौद्यासाठी मध्यस्थी करणारी कौशल्या बारकू पवार (६५) यांच्यासह जन्मदात्या आई-वडिलांवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

हवालदार राजाभाऊ कोल्हे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित दाम्पत्य त्यांच्या पहिल्या जोडीदाराला सोडून गेल्या तीन-चार वर्षांपासून लिव्ह इनमध्ये एकत्र राहत असून, ५ जुलै २०२६ रोजी घाटी रुग्णालयात महिलेने एका मुलाला जन्म दिला. यानंतर त्यांच्या ओळखीच्या कौशल्या पवार (वय ६५) हिने तुझा नवरा दारू पितो, तो बाळाचा सांभाळ कसा करेल? असे म्हणत माझी मुलगी सीमा लहान बाळ विकत घेण्याचा व्यवसाय करते, असे सांगून सीमासोबत बाळाच्या आईची ओळख करून दिली.

तुम्हाला सांभाळणे शक्य नसेल तर बाळ आम्हाला द्या, असा सल्ला तिने दिला. सुरुवातीला आईने बाळ देण्यास नकार दिला होता, मात्र आरोपी सीमा रेशवाल हिने बाळाच्या वडिलांना फोन करून जाळ्या ओढले आणि त्यांचे मनपरिवर्तन केले. अखेर ८ ऑगस् २०२६ रोजी आई-वडिलांनी सीमाकडून १ लाख २० हजा रुपये रोख घेऊन एका बॉण्ड पेपरवर सही करत आपले एक महिन्याचे बाळ तिच्या ताब्यात दिले.

पोलिस चौकशीत फुटले बिंग

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आई-वडिलांनी पैशांसाठी बाळ विकल्याची कबुली दिली. मात्र, आरोपी सीमा रेशवाल आणि तिची आई कौशल्या पवार यांच्याकडे बाळाबाबत कसून चौकशी केली असता, त्यांनी कोणतीही ठोस माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी हे बाळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खरेदी करून पुढे दुसऱ्या कोणालातरी विकले असावे किंवा लपवून ठेवले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

सीमा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि बाळ विकत घेतल्याचा आरोप असलेली सीमा रेशवाल हिच्याविरुद्ध २०२० मध्ये क्रांती चौक पोलिस ठाण्यात एका लग्नाळू तरुणाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या तरुणाला ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळली होती. दरम्यान, या प्रकरणामुळे बाळ खरेदी विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे करत आहेत.

बाळ परत मागताच उडवाउडवीची उत्तरे :

दुसऱ्या दिवशी जन्मदात्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी आम्हाला आमचे पैसे नकोत, बाळ परत कर, अशी मागणी सीमाकडे केली. मात्र, तिने बाळ बहिणीकडे दिले आहे, उद्या आणून देते, असे सांगत उत्तरे दिली. अनेक दिवस उलटूनही बाळ न दिल्याने अखेर आईने पोलिसांत तक्रार अर्ज दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT