Online application for PM Awas Yojana
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ५ गृहप्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात २४ हेक्टरमध्ये पाच ठिकाणी उभारल्या जात असलेल्या प्रकल्पांमधून ११ हजार १२० सदनिका उपलब्ध होणार असून, यासाठीची जाहिरात ८ डिसेंबरच्या आसपास प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी म्हाडा लॉटरीच्या धर्तीवरच लाभार्थीची निवड केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या पीएम आवास योजनेच्या फेज १ अंतर्गत पडेगाव, सुंदरवाडी, हसूल आणि तीसगाव येथील प्रकल्पांत एकूण ११,१२० घरांचे बांधकाम सुरू आहे. पडेगाव गट क्र.६९, सुंदरवाडी गट क्र. ९ व १०, तीसगाव गट क्र. २२५/१ आणि २२७/१ तसेच हर्सल गट क्र. २१६ येथे हे प्रकल्प आकार घेत आहेत. या प्रकल्पांमध्ये सुमारे ११ हजार १२० घरे बांधण्यात येत आहेत.
सुंदरवाडीत आरोथ्रॉन कन्स्ट्रक्शन, तिसगावात सहकार जेव्ही आणि एलोरा कन्स्ट्रक्शन, पडेगाव येथे लक्ष्मी जे. व्ही तर हसूल येथे सारा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. फेज १ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी लाभार्थीची निवड म्हाडाच्या धर्तीवरील ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी प्रोबीटी सॉफ्टवेअर प्रा. लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, या प्रकल्पांमधील घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर लॉटरी पद्धतीने लाभार्थीची निवड करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
लॉटरी प्रक्रियेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर
निवड प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने प्रोबीटी सॉफ्टवेअर प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती केली आहे. अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले गेले असून, सध्या त्याची तांत्रिक चाचणी सुरू आहे. ऑनलाईन अर्जानी अचानक मोठी गर्दी झाल्यास साइट हँग होऊ नये, यासाठी अधिकाधिक प्रेशर टेस्टिंग करण्यात येत असून, नागरिकांना अर्ज करताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची विशेष दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.