Online Application Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Online application : महाविद्यालय बदलासाठी ऑनलाइन अर्ज; पुराव्याची सक्ती

अकरावीनंतर कनिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Online application for college transfer; proof mandatory

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदापासून संपूर्ण ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली असून, अकरावीनंतर कनिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत. महाविद्यालय बदलासाठी ठोस कारणासह आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केल्याने विद्यार्थी व पालकांच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील चकरा वाढल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया २२ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते; मात्र ती २३ जूनच्या सायंकाळपासून सुरू झाली. नव्या ऑनलाइन प्रणालीमध्ये माध्यम, विषय आणि शाखा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र एका कनिष्ठ महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास केवळ अपवादात्मक परिस्थितीतच परवानगी दिली जाणार आहे.

महाविद्यालय बदलासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जासोबत कारण नमूद करावे लागणार असून, त्यासंदर्भातील पुरावे व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. पालकांची बदली झाल्यास संबंधित आदेशांच्या प्रती सादर केल्यानंतरच महाविद्यालय बदलास मान्यता मिळू शकते. अन्य कारणांसाठीही ठोस पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

महाविद्यालय बदलासंदर्भात अनेक विद्यार्थी व पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत असून, दूरध्वनीद्वारेही माहिती घेत आहेत. बारावीसाठी अन्य कनिष्ठ महाविद्यालयाचा पर्याय शोधणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक विभागाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

बारावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली राबविण्यात येत असून, विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विभागात सुमारे १,४०० कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
कैलास दातखीळ, शिक्षण उपसंचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT