onion farmers crisis pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : कांद्याने केले वांदे; उत्पादन खर्चही निघेना

भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

पुढारी वृत्तसेवा

ढोरकीन : कांद्याचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने ढोरकीनसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आवक वाढ, निर्यातीवर निर्बंध व हवामानातील बदलांमुळे साठवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्यामुळे वांद्यात आल्याचे चित्र ढोरकीनसह परिसरात दिसून येत आहे.

दरम्यान, ढोरकीनसह परिसरातील टाकळी, कारकीन, बोरगाव , 74 जळगाव, ढाकेफळसह आदी गावांत यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली. आता कांदा काढणीस वेग आला असून लागवड, बी-बियाणे, खते, औषधी फवारणी, मेहनत असा काढणीपर्यंत सर्व खर्च बघितला तर सर्वसाधारण जवळपास एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. मात्र, हवामानातील बदलांमुळे कांद्याच्या उत्पादनात घट मोठी घट झाली. त्याप्रमाणात कांद्याला अपेक्षित बाजारभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघतोय की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 800 पासून अवघ्या 500-600 रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. उन्हाळी कांद्याची बाजारात एकदम आवक वाढल्याने भावात घसरण झाली असून केंद्र सरकारकडून निर्यात शुल्कात वाढ किंवा इतर निर्बंध लादले गेल्याने स्थानिक बाजारात भाव पडले असल्याची चर्चा आहे.

नवीन कांदा काढणीला आल्याने आणि जुन्या कांद्याला दर नसल्याने चाळींमध्ये कांदा साठवण्याची वेळ आली आहे, मात्र त्यातही तो खराब होण्याची भीती आहे. बियाणे, खते, मजुरी, मेहनत व पाणी यांवरील खर्च वाढला, कर्जाचा डोंगर वाढत आहे.

हवामानात बदल

यावर्षी सतत हवामानात बदल होत राहिल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट बघायला मिळत आहे. त्यात कांद्याला भावही नाही. बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगामाचा खर्च या पिकावरच अवलंबून असतो. मात्र, कांद्याने वांदे केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे संतोष सोलाटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अनेक ठिकाणी कांदा चाळीत साठवून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असली तरी त्यातही तो खराब होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT