वैजापूर : कांदाउत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी तसेच सरकारने कांदा प्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी (१८) समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव इंटरचेंजजवळ झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत सरकारविर-ोधात जोरदार घोषणाबाजी केली. टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर आंदोलन करण्यात आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही रास्ता रोको आंदोलन केल्याने घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी दानवेंसह आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनप्रकरणी वैजापूर पोलिसांनी आमदार अंबादास दानवे यांच्यासह ४६ जणांवर तसेच ३० ते ४० अज्ञात शिवसैनिक व शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही आंदोलन केले. गुन्हे दाखल झाले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीचा लढा सुरूच राहील.अंबादास दानवे, आमदार
चुकीच्या पद्धतीने कुणी अशा प्रकारचे रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.सत्यजीत ताईतवाले, निरीक्षक