One Tree in the Name of Mother Campaign Accelerated
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' या प्रेरणादायी अभियानाला अधिक व्यापक जनसहभाग मिळावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात विक्रमी वृक्षारोपण अभियान यशस्वी करण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत वृक्षारोपण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन, गावनिहाय जबाबदाऱ्या, जनजागृती, वृक्षसंवर्धन आणि लोकसहभाग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाने 'आईच्या नावाने एक झाड' लावून पर्यावरण संवर्धनाच्या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले.
मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित पट्टा निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. युवक, महिला, शेतकरी, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सक्रिय सहभागातून अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यावर भर देण्यात आला. हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ घडविण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.
या बैठकीस वैजापूर व खुलताबादचे उपविभागीय अधिकारी (उपजिल्हाधिकारी), गंगापूरचे तहसीलदार, वैजापूर व खुलताबादचे तहसीलदार, गंगापूर व खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विविध
विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "एक झाड आईच्या नावाने... पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी," हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून अभियान लोकचळवळ बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात आली.