शहरातील एक हजार ट्रक बाहेर राज्यात अडकले file photo
छत्रपती संभाजीनगर

शहरातील एक हजार ट्रक बाहेर राज्यात अडकले

डिझेल टंचाईमुळे आठवड्यात करोडोची उलाढाल ठप्प

पुढारी वृत्तसेवा

One thousand trucks from the city are stranded in other states

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

इंधन टंचाईचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसला आहे. शहरातून विविध राज्यांत ट्रक साहित्य घेऊन जातात. त्यापैकी सुमारे एक हजार ट्रक गेल्या चार ते पाच दिवसांपासून इतर राज्यांत अडकून पडल्या आहेत. एकंदरीत या व्यवसायावर सुमारे २५ ते ३० टक्के विपरित परिणाम झाल्याची माहिती औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान यांनी दिली.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हे ट्रान्सपोर्ट व्यवसायांचे प्रमुख केंद्र आहे. येथून विविध राज्यांत दररोज अडीच ते तीन हजार ट्रक विविध साहित्य घेऊन जातात. शहरातून गुजरात, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, केरळ, भीमापूर, सिलीगुड्डी, कलकत्ता, कर्नाटक, इम्फाळ व इतर राज्यांत ट्रक जातात.

येथून आठ दिवसांपूर्वी विविध राज्यांत ऑर्डर घेऊन गेलेल्या सुमारे एक हजार ट्रक डिझेलच्या टंचाईमुळे तेथेच अडकून पडलेल्या आहेत आणि ज्या ट्रक सध्या असोसिएशनकडे आहेत, त्या डिझेलच्या टंचाईमुळे बाहेर पाठवण्यात अनेक अडचणी येत आहेत. याचा विपरित परिणाम या व्यवसायावर पडला आहे. सुमारे ३० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे.

वाहनचालकांचा नकार

ऑर्डर आहे, गाडीत डिझेलही आहे, परंतु लांब पल्ल्याच्या ऑर्डरवर जाण्यास वाहनचालक तयार नाहीत. जाताना डिझेलची व्यवस्था आहे, परंतु परत येताना डिझेल भेटले नाही तर काय करणार, अशी भीती सर्वच वाहनचालक बोलून दाखवत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला आणखीनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिझेल टंचाईच्या भीतीमुळे वाहनचालक बाहेर जाण्यास नकार देत आहेत, अशीही माहिती फैय्याज खान यांनी दिली.

करोडोंची उलाढाल ठप्प

छत्रपती संभाजीनगर ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. या व्यवसायातून दररोज करोडोची उलाढाल होते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून डिझेल-पेट्रोलचा तुटवडा होत असल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, करोडोंची उलाढाला ठप्प झाली आहे. ही टंचाई अशीच राहिली तर ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती खान यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT