

Four-Hour Traffic Jam in Ajanta Ghat
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरड्डजळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात सोमवारी (दि.२३) सकाळी सलग तीन अवजड वाहने बंद पडल्याने तब्बल चार तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाटातील अरुंद व वळणदार रस्त्यावर ही वाहने अडकून राहिल्याने दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या. या कोंडीत वाहनचालक, शालेय विद्यार्थी, रुग्ण व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रेलर (आरजे ४५ जीए ०५७१) घोडीपटांगण परिसरात घाट चढत असताना अचानक बंद पडला. त्यानंतर काही वेळातच ट्रक (एम एच २० जी झेड ४१४३) व ट्रक (एम पी ०९ एच एच २६६४) ही दोन अवजड वाहनेही एकामागून एक बंद पडली. परिणामी आधीच अरुंद असलेल्या मार्गावर वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला.
सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दोन्ही बाजूंनी येणारी वाहने समोरासमोर अडकली आणि परिस्थिती अधिकच बिकट झाली. रुग्णवाहिका, शालेय बस, खासगी वाहने अशा सर्वच प्रकारच्या वाहनांना या कोंडीत तासन्तास थांबावे लागले. घटनेची माहिती मिळताच पो. कॉ योगेश कोळी, विनोद कोळी पो.ना नीलेश लोखंडे, जगदीश सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अडकलेली वाहने टप्प्याटप्प्याने बाहेर काढत अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान अजिंठा घाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास पर्यटन व स्थानिक जनजीवनावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंत्यविधीलाही उशीर
फर्दापूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वराडे यांचे वडील राजाराम वराडे यांचे निधन झाल्याने सोमवारी सकाळी १० वाजता त्यांचा अंत्यविधी होणार होता. मात्र अंत्यविधीसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा येथून येणारे अनेक नातेवाईक सोमवारी सकाळी घाटातील वाहतूक कोंडीत अडकले. बराच वेळ वाट पाहून ही वाहतूक कोंडी न सुटल्याने शेवटी पोलिसांच्या सहकार्याने पाहुण्यांची वाहने कोंडीतून बाहेर काढण्यात आली. परिणामी, अंत्यविधीला सुमारे एक ते दीड तास उशीर झाला.