One person drowned in Waghnala with a bullock cart
कन्नड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जैतापूर ते हतनूर हद्दीच्या मध्यभागी शिवना टाकळी प्रकल्पामध्ये वाघनाल्यामध्ये जैतापूर येथील कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६ वर्ष) हे बैलगाडीसह बुडाल्याची घटना घडली. ही घटना दि. १६ रोजी घडली.
यात आजुबाजूच्या लोकांनी देवगाव पोलिस पथकाच्या मदतीने कोरडे यांचा रात्री उशीरा पर्यंत शोध घेतला. मात्र कोरडे यांचा शोध लागला नव्हता. दि.१७ रोजी सकाळी सहा वाजता पाण्यावर कोरडे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आल्याने बाळू परांडे, उमेश कोरडे यांनी पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला.
यावेळी कैलास कोरडे यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पंधरा ते वीस हजाराच्या जवळपास दोनशे रुपयाच्या नोटा असलेली रक्कम, काही कागदपत्रे व अंगातील बदलेले जुने कपडे असल्याची माहिती बाळू परांडे यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जैतापूर येथील कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६ वर्ष) हे बैलगाडीसह वाघनाल्याच्या पाण्यातून आपल्या लेकीकडे पळसवाडी येथे गेले होते. ते संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परत त्याच नाल्यातुन येत होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने ते मोठ्या खड्ड्यात बैलगाडीसह बुडाले होते. यामुळे आजूबाजूच्या लोकांनी शोध मोहीम सुरु केली. एका बैलाचे जोते तुटल्याने तो बैल पाण्यातून पोहून बाहेर आला तर दुसरा बैल पाण्यात बुडून मृत्यू पावला. लोकांनी गळ टाकून बैलगाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली, मात्र कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता.
स्थानिक मुलांनी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पाण्यात कोरडे यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. तर सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.