Nurse sexually assaulted after being lured with promise of marriage; preparations underway for marriage to another woman; one arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : परिचारिकेला लसाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी संसार तयारीत असलेल्या जवानाला छावणी पोलिसांनी त्याच्या हळदीच्या दिवशीच बेड्या ठोकल्या. मयूर कैलास निकाळजे (रा. रमानगर) असे या आरोपी जवानाचे नाव आहे. ऐन लग्नाच्या आदल्या दिवशीच त्याला अटक झाल्याने त्याचे ठरलेले लग्न रद्द झाले आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरातील एका २३ वर्षीय पीडित तरुणीची मयूर निकाळजे याच्याशी नाशिक येथे एका लग्न समारंभात ओळख झाली होती. त्याने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला वारंवार कॉल केले. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. दोन महिन्यांनंतर तिने त्याचा फोन उचलला.
त्याने तू मला खूप आवडते, असे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०२४ पासून दोघांचे बोलणे सुरू झाले. मयूर हा सैन्य दलात कार्यरत असून, ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. सप्टेंबर २०२५ मध्ये मयूर सुटीवर आला असताना त्याने पडेगाव येथील एका हॉटेलमध्ये तिला नेऊन लग्नाचे आमिष दाखवले तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तू चिंता करू नको, मी तुझ्याशी लग्न करेल. घरचे नाही बोलले तर आपण कोर्टमॅरेज करू, असे वचन त्याने दिले.
पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
१६ जून २०२६ रोजी मयूरने पीडितेला गजानन महाराज मंदिर परिसरातील एका ज्यूस सेंटरवर बोलावले. घरच्यांच्या दबावामुळे मी साखरपुडा केला आहे. 'मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, मला तुझ्याशी काही देणेघेणे नाही', असे बोलून तो निघून गेला. या धक्कादायक प्रकारामुळे नैराश्य आल्याने पीडितेने घराकडे जाताना रस्त्यात मेडिकलवरून उंदीर मारण्याचे औषध घेऊन घरी गेली. घरच्यांना कोणत्या तोंडाने सांगू, असा प्रश्न पडल्याने तिने किचनमध्ये जाऊन औषध पिले. त्यानंतर मयूरला कॉल केला. तू माझ्यासोबत दगा केल्याने मी औषध पिऊन जीव देत आहे, असे सांगितले. तरीही त्याने काहीही न बोलता फोन कट केला. तिला उलट्या होऊन त्रास सुरू झाला. मात्र सुदैवाने तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने ती बचावली.
हळदीच्या मंडपातून थेट कोठडीत
दरम्यान, आरोपी मयूर सुटीवर येऊन दुसऱ्याच तरुणीशी विवाह करणार होता. काल त्याची हळद होती आणि आज त्याचे लग्न होते. मात्र पीडितेने छावणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपी मयूरला हळदीच्या मंडपातूनच अटक केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे लग्न रद्द झाले असून, आरोपीची रवानगी आता पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत झाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शेंबाळे करत आहेत.