Now I will not leave Mumbai without reservation: Manoj Jarange
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आपापसांतील वाद सोडा. समाजाची एकजूट करून आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी २९ ऑगस्टला मुंबईतील महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आव्हान करतांनाच 'मी शब्द देतो, माझा जीव गेला तरीही आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसून, मुंबई सोडणार नाही', असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी (दि.२१) छत्रपती संभाजीनगर येथे दिला.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघणाऱ्या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या झाल्टा गावात गुरुवारी (दि. २१) सायंकाळी आयोजित बैठकीत जरांगे समाजबांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शेकडोंच्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. यावेळी जरांगे म्हणाले, आता लेकरांच्या भविष्यासाठी मुंबईला जाणे आवश्यक आहे. मी समाजाला हरताना बघू शकत नाही. त्यामुळे मुंबईत लढणार किंवा मरणार, मात्र आरक्षणाशिवाय परतणार नाही. आपल्याला मोर्चात शांततेच्या मागनि जायचे आहे.
दगडफेक, जाळप-ोळ करायची नाही. शांततेच्या मार्गान आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे, असे ते म्हणाले. तसेच सरकारने मागील उपोषणावेळी तीन महिने वेळ मागितला होता, पण आता आठ महिने उलटले तरी काहीच नाही. मग आम्ही का ऐकावे? आता झुकणार नाही. जे होईल ते होऊ द्या. मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार, अडवण्याचा प्रयत्न केल्यास खाक व्हाल, असा इशारा सरकारला दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची भीती दाखवू नये. मुंबईत तर येणार म्हणजे येणार, असाही इशारा त्यांनी दिला.