Now all corporators' letterheads will be uniform!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महानगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेवकांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या लेटरहेड्समुळे प्रशासकीय कामकाजात निर्माण होणारा गोंधळ आता थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही लेटरहेडवर संभाजीनगर, काहींवर छत्रपती संभाजीनगर, तर काहींवर अद्यापही औरंगाबाद असा उल्लेख आढळत असल्याने अधिकृततेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांसाठी एकच अधिकृत आणि निश्चित फॉरमॅट लागू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त महापौर यांच्याशी चर्चा करून अंतिम फॉरमॅट निश्चित करणार आहेत.
महापालिकेत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांपैकी सध्या अनेक नगरसेवक किंवा त्यांच्या कार्यकत्यांकडून स्वतंत्र पद्धतीने लेटरहेड तयार करून वापरले जात आहे. त्यामुळे संबंधित पत्रांची सत्यता तपासताना अडचणी येत आहेत.
तसेच काही प्रकरणांत बनावट लेटरहेड्सचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबी लक्षात घेऊन महापालिकेचे अधिकृत चिन्ह, शहराचे निश्चित नाव आणि ठराविक रंगसंगती यांचा समावेश असलेला एकसमान साचा तयार करण्यासंदर्भात मनपा आयुक्त जी. श्रीकांत लवकरच महापौर समीर राजूरकर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
यात लेटरहेडवर नगरसेवकाचे नाव, प्रभाग क्रमांक, संपर्क क्रमांक तसेच छायाचित्र असावे की नाही, याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. एकदा फॉरमॅट निश्चित झाला की, त्यानंतर सर्व नगरसेवकांना त्याच साच्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.