Notorious Pawan Jaiswal threatens Deputy Mayor Rajendra Janjal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तुम्हाला मारण्यासाठी एकाने मला पाच लाख रुपयांची सुपारी दिली आहे. तुम्ही जर मला दहा लाख रुपये दिले, तरच मी तुम्हाला सोडतो, अशी थेट जीवे मारण्याची धमकी देत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याकडे तब्बल १० लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. गारखेडा परिसरातील कुख्यात गुंड पवन जैस्वाल याने कॉल करून ही खंडणी मागितली.
हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास घडला. या घटनेनंतर जंजाळ यांनी कार्यकर्त्यांसह पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची भूमिका घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त समर्थकांनी ठाण्यातच ठिय्या मांडल्याने अखेर पोलीस उपायुक्तांनी मध्यरात्री धाव घेऊन पवन जैस्वालविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गारखेडा भागातील कुख्यात गुंड पवन जैस्वाल याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर एमपीडीए आणि तडीपारीसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवायाही झालेल्या आहेत. - अशा सराईत गुन्हेगाराने थेट उपमहापौरांनाच टार्गेट केल्याने राजकीय व गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते सात - वाजेच्या सुमारास उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या आयफोनवर पवन जैस्वालचा कॉल आला. कॉल उचलल्यानंतर पवनने थेट धमकावण्यास सुरुवात केली. मला तुमच्या हत्येची पाच लाखांची सुपारी मिळाली आहे, जर जीव वाचवायचा असेल तर मला दहा लाख रुपये द्या, नाहीतर संपवून टाकेन, असा दम त्याने भरला.
आयफोनवर थेट स्क्रीन आणि अंतर्गत ऑडिओ रेकॉर्डिंग होत नसल्याने जंजाळ यांनी तत्काळ प्रसंगावधान राखले. त्यांनी आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्याच्या दुसऱ्या मोबाईलवरून पवन जैस्वालसोबत सुरू असलेल्या या कॉल संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतले. हा भक्कम पुरावा हाती आल्यानंतर जंजाळ यांनी थेट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलीस आयुक्तांना माहिती दिल्यानंतर जंजाळ हे कार्यकर्त्यांसह पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले. मात्र, ठाण्यातील ड्युटीवरील पोलिसांनी थेट गंभीर गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची तयारी दर्शवली. लोकप्रतिनिधीला जीवे मारण्याची आणि खंडणीची थेट धमकी मिळत असताना पोलीस टाळाटाळ करत असल्याचे पाहून कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. अवघ्या काही वेळातच पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात जंजाळ समर्थकांची मोठी गर्दी जमली. "जोपर्यंत कुख्यात गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठाण्यातून हलणार नाही, असा पवित्रा घेत उपमहापौर जंजाळ आणि शेकडो समर्थकांनी रात्री आठ वाजेपासून ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे ठाणे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
डिसीपी नवले ठाण्यात; अखेर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू
प्रकरणाचे गांभीर्य आणि ठाण्यातील वाढता जमाव पाहून परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी रात्री उशिरा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जंजाळ यांनी सादर केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे तपासल्यानंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांनी, हे प्रकरण खंडणी आणि धमकीचे असल्याने कायदेशीर तरतुदी-नुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड पवन जैस्वालविरुद्ध खंडणी व धम-कावण्याचा रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.