Nomination forms will be available at nine locations
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या २९ प्रभागांतील ११५ वॉर्डाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज वितरणासह भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी ९ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे (आरओ) कार्यालय सुरू केले असून, सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तयारी ३० डिसेंबर राहणार आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर आणि पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक प्रभागनिहाय होत आहे. २९ प्रभागांमधून ११५ सदस्य निवडून द्यावे लागणार असून, २८ प्रभाग हे चार सदस्यीय आणि एक प्रभाग तीन सदस्यीय बनविण्यात आला आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादी अंतिम करण्यात आली असून, ११ लाख १८ हजार २८३ मतदार राहतील. २९ प्रभागांसाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असून, पाच झोन कार्यालयांसह इतर चार ठिकाणी कार्यालये सुरू करण्यात आले आहेत.
या कार्यालयांसाठी स्टेशनरी पुरविण्यात आली. झोन कार्यालयाचे सर्व कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेले कर्मचारी निवडणुकीचे काम करतील. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. शासकीय सुटी वगळून (रविवारसह) ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्जाची स्वीकृती होणार आहे.
२०० बस, ३०० जीप
निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी २०० बस आणि ३०० जीप लागणार आहेत. यात स्मार्ट सिटीच्या ६० बसची मदत घेण्यात येणार आहे. तर एसटी महामंडळाकडून १४० बस उपलब्ध होणार आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार रुपये डिपॉझिट
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार रुपये, तर महिला व राखीव उमेदवारासाठी २५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर उमेदवारी अर्जासाठी शंभर रुपये शुल्क आणि त्यासोबत निवडणुकीची माहिती पुस्तिका असून, त्याचे वेगळे शंभर रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ३०० अर्ज देण्यात आले आहेत.