Sambhajinagar News : चार मृत्यूनंतरही धडा नाही! टेंभापुरीत पुन्हा तरुणांचा स्टंट file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : चार मृत्यूनंतरही धडा नाही! टेंभापुरीत पुन्हा तरुणांचा स्टंट

मनाई झुगारून जीवाशी खेळ सुरूच, प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

No Lesson Learned Even After Four Deaths! Youths Perform Stunts Again in Tembhapuri

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : चार जणांचा बुडून मृत्यू होऊनही गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी धरण परिसरात निष्काळजीपणाचे धक्कादायक चित्र कायम आहे. धरणात उतरण्यास आणि पोहण्यास प्रशासनाची स्पष्ट मनाई असतानाही, काही तरुणांकडून जीव धोक्यात घालून पाण्यात उतरण्याचे प्रकार सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धरण परिसरात जलसंपदा विभागाने पाण्यात उतरण्यास सक्त मनाई अशा सूचना फलकांद्वारे वारंवार इशारे दिले आहेत. आदे-शाचे उल्लंघन करून दुर्घटना घडल्यास संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, या सर्व चेतावण्यांकडे दुर्लक्ष करून काही युवक आजही सर्रासपणे धरणात पोहताना दिसत आहेत.

मृत्यूचे सत्र थांबता थांबेना

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत टेंभापुरी धरण मृत्यूचा सापळा ठरले आहे. २६ एप्रिल रोजी मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच, अवघ्या काही दिवसांत १ मे रोजी आणखी तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. पण प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.

कठोर पावले उचलण्याची मागणी

सूचना, फलक आणि मृत्यूच्या घटनांचे स्पष्ट संकेत असूनही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता केवळ कागदी घोडे न नाचवता, पोलिसांनी आणि धरण प्रशासनाने परिसरात गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गाळ आणि अदृश्य खड्डे

स्थानिकांच्या मते, धरण परिसरात काही ठिकाणी अवैध उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज लागत नाही. वरून शांत दिसणारे पाणी क्षणात जीवघेणे ठरू शकते. तरीही केवळ मजा आणि सोशल मीडियावरील स्टंटच्या नादात तरुण जीवाशी खेळत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

हा प्रकार केवळ स्वतःच्या जीवाशी खेळ नसून प्रशासनालाही थेट आव्हान देण्यासारखा आहे. वारंवार दुर्घटना होऊनही कोणी शहाणपणाने वागत नसेल, तर प्रशासनाने आता केवळ सूचना न देता कठोर कारवाई करून वचक निर्माण करणे गरजेचे आहे.
- राहुल ढोले, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT