Ban on DJ Sound Systems : सणासुदीत डीजेला 'नो एन्ट्री'; शहरात दोन महिने मनाई आदेश लागू file photo
छत्रपती संभाजीनगर

Ban on DJ Sound Systems : सणासुदीत डीजेला 'नो एन्ट्री'; शहरात दोन महिने मनाई आदेश लागू

पोलिस आयुक्तांचा दणका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

'No Entry' for DJs during the festive season; prohibitory orders in force in the city for two months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोठा दणका दिला आहे. सणांच्या काळात शहरात डीजे साऊंड सिस्टीमवर कडक बंदी घालण्यात आली असून, संपूर्ण पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १८ नोव्हेंबरपर्यंत विशेष प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे मनाई आदेश १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात लागू राहतील. या दोन महिन्यांच्या काळात शहरात गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, घटस्थापना, दुर्गादेवी मूर्ती आगमन व विसर्जन आणि दसरा असे मोठे उत्सव साजरे होणार आहेत. या उत्सवांमध्ये डीजे साऊंड (टॉप, मिड, बेस अशी मल्टीस्पीकर सिस्टीम), प्लाझ्मा साऊंड सिस्टीम, प्रेशरमिड साऊंड सिस्टीम आणि थरावर थर लावण्यासाठी बदल केलेल्या वाहनांच्या वापरावर पूर्णपणे कडक बंदी घालण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांनी साऊंड सिस्टीमचे मालक, चालक आणि उत्सव मंडळांच्या आयोजकांना सक्त ताकीद दिली आहे. या सिस्टीम कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वापरण्यास किंवा इतरांना भाड्याने/वापरास देण्यास सक्त मनाई आहे. मालकांनी त्यांच्या ताब्यातील डॉल्बी, प्लाझ्मा सिस्टीम आणि त्यासाठी वापरली जाणारी मॉडिफाय केलेली वाहने स्वतःच्याच जागेवर 'सीलबंद' स्थितीत ठेवावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर किंवा साऊंड सिस्टीम मालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार आणि प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ध्वनिप्रदूषण नियम २००० मधील मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या कायदेशीर आणि पारंपरिक साऊंड सिस्टीमला या अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका यापूर्वी अशा मल्टीलेयर साऊंड सिस्टीमच्या दणद‌णाटामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि बघ्या नागरिकांना कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व येणे किंवा जीवितास धोका निर्माण होण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. याशिवाय, या सिस्टीम लावण्यावरून मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT