NIA Raids Waluj; Suspect Subjected to Intense Interrogation
छत्रपती संभाजीनगर / वाळूज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (दि.२९) भल्या पहाटे वाळूज परिसरात धडक कारवाई करत छापा टाकला. जवळपास आठ ते दहा तास चाललेल्या या कसून चौकशीत तपास यंत्रणांच्या हाती मोठे धागेदोरे लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, बोगस आधारकार्ड, हत्यारे आणि पाक कनेक्शनच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शहरात एटीएस आणि आयबीने छापेमारी केली होती. त्यानंतर एनआयएच्या पथकाने वाळूज गावातील कमळापूर-रांजणगाव शेणपुंजी रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील श्रद्धा कॉलनीत शुक्रवारी पुन्हा झाडाझडती घेतली. नव्याने उभारण्यात आलेल्या एका इमारतीला पोलिसांनी चाहोबाजूंनी कडेकोट वेढा घातल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
या पथकात चार अधिकारी, एका महिला अधिकाऱ्यासह एका कमांडोचा समावेश होता. स्थानिक पोलिसांचीही यासाठी मदत घेण्यात आली. या इमारतीमध्ये परराज्यातील काही जण आणि एक मोटार मेकॅनिक राहत असल्याची माहिती समोर आली असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. एनआयएचे पथक या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते.
अखेर शुक्रवारी थेट छापा टाकून घराची आणि कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. यात अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती लागली असली तरी तपास यंत्रणांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परिसरात मात्र या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले होते.
पंधरा दिवसांपूर्वीच १३ संशियितांची चौकशी
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्याने झाडाझडती सुरू आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच एटीएस आणि आयबीने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गैंगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून जुन्या शहरासह एमआयडीसी वाळूज परिसरातून १३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. त्या कारवाईशी आजच्या छापेमारीचा काही संबंध आहे का? याबाबतही शक्यता वर्तविली जात आहे.