खुलताबाद : शहरातील ग्रामीण रुग्णालय-म्हैसमाळ रोड या मुख्य मार्गावर सुमारे ५० लाख रुपये खर्च करून ७०० मीटर लांबीचा डांबरी रस्ता नुकताच पूर्ण करण्यात आला. नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून हे काम झपाट्याने पूर्ण झाले असले, तरी या रस्त्याच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता तयार होऊन अजून २० दिवसही पूर्ण झाले नाहीत, तोच रस्ता अनेक ठिकाणी उखडू लागला आहे.
एवढा मोठा निधी खर्च करूनही फक्त ५ हजार रुपये खर्चाचा एक सिमेंट पाईप टाकण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने नव्या रस्त्याची अवघ्या काही दिवसांतच चाळण झाली आहे. ग्रामीण रुग्णालय परिसरातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीकडून स्वच्छता किंवा ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी या रस्त्यावरून वाहत जाते. पूर्वी जुन्या रस्त्याच्या मधोमध एक सिमेंट पाईप टाकण्यात आला होता. मात्र नवीन डांबरी रस्ता तयार करताना तोच जुना पाईप तसाच ठेवण्यात आला, नव्या पाईपची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी, पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागले असून रस्त्याचा डांबर निघू लागला आहे. डांबराखालील खडी बाहेर येत असून, रस्त्यावरून जाणे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.
पाईप टाकण्याची तरतूदच नव्हती या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्याची तरतूदच नव्हती असे उत्तर देत संबंधित अधिकारी मोकळे झाले. मात्र नागरिकांचा संतप्त सवाल असा आहे की, ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या अंदाजपत्रकात मूलभूत गरज असलेल्या पाणी निचऱ्याची तरतूदच कशी नसू शकते? जर तरतूद नव्हती, तर काम सुरू असताना कोणीही याकडे लक्ष का दिले नाही? अभियंते, मोजणी अधिकारी, ठेकेदार सगळे नेमके काय करत होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक पुढारीने आधीच दिला होता इशारा
विशेष म्हणजे, रस्त्याचे काम सुरू असतानाच दैनिक पुढारी ने ५० लाखांचा रस्ता, पण ५ हजारांचा पाईप नाही! ही बातमी प्रसिद्ध करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते. आज अवघ्या पंधरा-वीस दिवसांतच रस्त्याची चाळण सुरू झाली आहे.
निकृष्ट काम उघड
रस्त्याच्या डांबरीकरणाच्या गुणवत्तेवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणी लागल्यानंतर इतक्या लवकर डांबर उखडणे म्हणजे कामात वापरलेला माल निकृष्ट दर्जाचा होता का? मोजमाप आणि देखरेख योग्यरीत्या झाली होती का? की केवळ बिल काढण्यासाठी घाईघाईत काम उरकण्यात आले असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
नागरिकांचे प्रश्न
नवीन रस्ता खोदून पाईप बसवला जाणार का असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. नवीन सिमेंट पाईप बसवण्यात यावा, रस्त्याच्या कडेला योग्य ती भरती करून मजबुतीकरण करण्यात यावे, निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पावसाळ्यात धोका वाढणार
फक्त पाईपच नव्हे, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक ती भरतीसुद्धा करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला माती वाहून जाण्याची, रस्ता खचण्याची शक्यता अधिक आहे. पाणी निचरा आणि भरती या दोन मूलभूत बाबी नसल्याने हा रस्ता काही महिन्यांतच पूर्णपणे खराब होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सदरील कामाच्या अंदाजपत्रकात रस्त्यात कुठेही नवीन सिमेंट पाईप टाकण्याची तरतूद करण्यात आ-लेली नाही त्यामुळे पाईप टाकला नाही. पाईप नसल्यामुळे रस्त्यावर पाणी जात आहे हे खरं आहे. आम्ही रस्त्याच्या बाजूने चारी मारून पाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा करणार आहोत.सागर सावजी, कनिष्ठ अभियंता, सा. बां. विभाग.