New water supply scheme: Setback for increased water supply again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रावरील गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचा दावा कंत्राटदाराने केला असला, तरी योजना अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हमधील बटरफ्लाय व्हॉल्व्हची दुरुस्ती अपूर्ण असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पंपिंग सुरू करण्यास नकार दिला असून, अंतिम निर्णय जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव घेणार आहेत.
त्यामुळे २४ जूनपासून बंद असलेली योजना पुन्हा कार्यान्वित होण्याबाबतची अनिश्चितता कायम असल्याने शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याला पुन्हा ब्रेक लागला आहे. तर जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अॅप्रोच चॅनलचेही काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच २४ जून रोजी नक्षत्रवाडी येथील नव्या पंपहाऊसच्या स्लॅबमधून गळती आढळून आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जायकवाडी धरणातून होणारा पाणी उपसा तातडीने बंद करण्यात आला होता. त्यानंतर कंत्राटदार कंपनीने आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील गळती थांबविल्याचा दावा केला आणि पंपिंग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे परवानगीची मागणी केली.
मात्र, मुख्य जलवाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय पंपिंगला परवानगी देता येणार नाही, असे जीवन प्राधिकरणाने लेखी कळविले आहे. त्यामुळे योजना सुरू करण्याचा निर्णय आणखी काही काळ लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या विषयावर अंतिम निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगानायक घेणार आहेत. मंगळवारी निर्णय अपेक्षित होता. मात्र तो अद्याप झालेला नसून महापालिकाही त्याची प्रतीक्षा करत असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
उपसा विहिरीत पाणी साचले
नाथसागर परिसरात सुरू असलेले अॅप्रोच चॅनलचे कामही तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उपसा विहिरीत (जॅकवेल) मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सध्या काम सुरू ठेवल्यास मातीच्या बंधाऱ्यावर अतिरिक्त दाब येऊन तो तुटण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रथम पंपिंग सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरच अॅप्रोच चॅनलचे उर्वरित काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.