New water scheme faces another setback due to vacuum pump burnout
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या प्रयत्नाला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींचा फटका बसला. जॅकवेलमधून मुख्य जलवाहिनीत पाणी सोडण्याचे काम सुरू असतानाच सायफन यंत्रणेवरील व्हॅक्यूम पंप शनिवारी (दि. १३) मध्यरात्री जळाल्याने पाणी उपसा तातडीने थांबवावा लागला. त्यानंतर रविवारी (दि.१४) दिवसभर दुरुस्तीची कामे करून सायंकाळी नवीन पंप बसविण्यात आला आणि जलवाहिनीत पुन्हा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेली ३९२ एमएलडी क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ जूनपासून शहराला या योजनेतून पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामात दोन दिवसांचा विलंब झाला. त्यानंतर सायफन प्रणालीद्वारे पाणी उपसा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
शनिवारी सायंकाळी जॅकवेलवरील ३७०० अश्वशक्तीचा पंप सुरू करून मुख्य जलवाहिनीत पाणी सोडण्यात आले होते. संपूर्ण यंत्रणेवर देखरेख सुरू असतानाच मध्यरात्री व्हॅक्यूम पंप निकामी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी पाणी उपसा त्वरित बंद करण्यात आला.
त्यानंतर रविवारी सकाळपासून तांत्रिक पथकाने दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. खराब झालेल्या यंत्रणेच्या जागी दोन नवीन व्हॅक्यूम पंप बसविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४.४० वाजता पाणी उपसा पुन्हा सुरू करण्यात आला. आता आज सोमवारी सकाळपर्यंत नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचेल. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे-
१२ जूनचा मुहूर्त अजूनही रखडला
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जूनपासून नव्या योजनेतून शहराला पाणीपुरवठा सुरू करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, सुरुवातीला मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फुटल्याने आणि त्यानंतर व्हॅक्यूम पंप जळाल्याने नियोजित वेळेत योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही
जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा
जॅकवेलवरील पंप पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी सायंकाळपासून मुख्य जलवाहिनीत पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत राहिल्यास नव्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला प्रत्यक्ष पाणीपुरवठा लवकरच सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या योजनेकडे शहराचे लक्ष
शहराच्या वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या योजनेमुळे शहराला अधिक प्रमाणात आणि नियमित पाणीपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर योजना कार्यान्वित होण्याच्या उंबरठ्यावर असताना वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे नागरिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.