हायड्रोलिक चाचणी वगळल्याने पुन्हा निखळली वेल्डिंग pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Water Project : हायड्रोलिक चाचणी वगळल्याने पुन्हा निखळली वेल्डिंग

२५०० ची जलवाहिनी उद्घाटनापूर्वीच ठरतेय डोकेदुखी, २०४५ सालापर्यंत टिकेल का?

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :शहरवासीयांना पुढील २०४५ सालापर्यंत दररोज मुबलक पाणीपुरवठा मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून २७४० कोटी खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेतेन जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र यादरम्यान २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, या जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीतून तब्बल ८० टक्के भाग वगळून केवळ ठरावीक ठिकाणी चाचणी घेतली आहे. त्यामुळे पाणीचाचणीत सतत जलवाहिनीचे वेल्डिग निखळत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या वेल्डिंगच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात ही नवी जलवाहिनी महापालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहराला १२ जूनपासून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आणि जीव्हीपीआर कंपनीकडून प्रयत्न सुरू आहे. या कामाची पाहणी शनिवारी केली. या जलवाहिनीतून गेल्या आठवड्यापासून पुन्हा जायकवाडीहून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू केली. या कामाचा आढावा शनिवारी (दि. १६) विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी घेतला.

पहिल्या टप्प्यात घेतलेल्या पाण्यात मोठ्याप्रमाणात गढूळतेचे प्रमाण आढळले. त्यामुळे मुख्य जलवाहिनी स्वच्छ करून पुन्हा नव्याने त्यातून पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परतु, गुरुवारी (दि. १५) ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कवडगावजवळील साईमंदिर-ाजवळील बटरफ्लाय व्हॉल्व्हलगत जलवाहिनीला मोठी गळती सुरू झाली.

जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी बाहेर येत असल्याने तातडीने कवडगाव ते बिडकीन दरम्यानची मुख्य जलवाहिनी रिकामी करण्यासाठी स्कोअर व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. शनिवारी सकाळपासून मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी जेसीबीद्वारे जलवाहिनीवरील माती काढून ती मोकळी करण्यात आली. जलवाहिनीची वेल्डिग निखळल्याचे निदर्शनास आले.

तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री हे काम रविवारी सकाळपर्यंत पूर्ण करून दुपारपासून पुन्हा जलवाहिनीतून पाणी सुरू करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी २३ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत घेतलेल्या पाणी चाचणीतही जलवाहिनीचे वेल्डिग असेच निखळले होते. त्याच्या दुरुस्तीला बराच कालवधी लागला होता. त्यानंतर स्क्रोल व्हॉल्व्हचे दोन तुकडे झाले. केवळ दोन पंपांवर सुरू असलेल्या पाण्याच्या दाबाने जलवाहिनीचे वेल्डिंग निखळत आहे. व्हॉल्व्हचे दोन तुकडे होत असल्याने कामावरच संशय व्यक्त होत आहे.

३९५ एमएलडी पाणी येणार का

शहराची २०४५ सालापर्यंतची लोकसंख्या लक्षात घेत शासनाने ही नवी २७४० कोटी खर्चाची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किलो मीटर अंतरात २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यातून पाच ३७५० आश्वशक्ती क्षमतेच्या पंपाद्वारे ३९५ एमएलडी पाणी शहरात येणार आहे. सध्या शहरातील १८ ते २२ लाख लोकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेला दररोज २०० ते २२५ एमएलडी पाण्याची गरज आहे.

करारातील अटीशर्ती वगळल्या

शासन प्रत्येक पाणीपुरवठा प्रकल्पा राबविताना जलवाहिन्यांची हायड्रोलिक चाचणी करण्याची अट आवर्जून टाकते. तसे निविदांसह कंत्राटदारासोबत केलेल्या करारामध्येही नमूद असते. परंतु, महापालिकेसाठी टाकण्यात आलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामात ही अट असताना ठरावीक ठिकाणीच हायड्रोलिक चाचणी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT