New Safari Park : प्राणिसंग्रहालय स्थलांतराच्या हालचालींना वेग file photo
छत्रपती संभाजीनगर

New Safari Park : प्राणिसंग्रहालय स्थलांतराच्या हालचालींना वेग

महिनाअखेर महानगरपालिका सीझेडएला करणार अर्ज, नव्या प्राण्यांचीही मागणी होणार

पुढारी वृत्तसेवा

New Safari Park: Zoo relocation moves accelerate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय लवकरच मिटमिटा येथील नव्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्यासाठी महिनाअखेरीस महापालिका प्रशासन केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सेंट्रल झू अथॉरिटी) अर्ज करणार आहे. त्यासोबतच नव्या विविध प्राण्यांची मागणी देखील केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

स्मार्टसिटी डेव्लपमेंट कार्पोरेशनने मिटमिटा परिसरात अडीचशे कोटी रुपये खर्चुन सफारी पार्क तयार केले आहे. या पार्कचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु, आता स्मार्टसिटी प्रकल्पाला केंद्राने मुदतवाढ देता स्थगित केले आहे. त्यामुळे प्रत्येक शहरातील स्मार्टसिटीचे प्रकल्प त्या त्या शहराच्या महापालिकांकडे वर्ग करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे प्रकल्पदेखील महापालिकेकडे देण्यात आल्याने आता स्मार्टसिटीचे अंतिम टप्प्यातील कामावर महापालिका सिद्धार्थ उद्यान विभागाचे लक्ष आहे.

येत्या दिवाळीमध्ये या पार्कचे लोकार्पण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वप्रथम या पार्कमध्ये जंगलाप्रमाणे प्राण्यांना आवश्यक असलेले निसर्गरम्य वातावरण तयार करण्यात येत आहे. १०० एकर जागेत उभारलेल्या पार्कमध्ये झू अथॉरिटीच्या मार्गदर्शनानुसार हिंस्र प्राण्यांसाठी भव्य पिंजरे तयार केले आहेत. विविध प्राण्यांचे सुमारे ५५ पिंजरे यात आहेत. पर्यटकांना आवश्यक त्या सर्व सुविधा या पार्कमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

८ हजार झाडांची लागवड

सफारी पार्कमध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या ८ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यासोबतच प्राणिसंग्रहालयाला चारही बाजूंनी संरक्षण भिंत उभारली आहे.

मोठी झाडे आणून लावणार

या सफारी पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्या पिंजऱ्यामध्ये मोठी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राण्यांना झाडांच्या सावलीत बसता येणे शक्य होईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. पावसाळ्यातच ही झाडे लावण्यात येणार असून त्यासाठी नर्सरीशी संपर्कही साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सुविधा असतील

या सफारी पार्कला भव्य प्रवेशद्वार आहे. त्यासोबतच दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी भव्य पार्किंग, अॅडीटोरियम, हॉल, अँपी थेअटर, स्केटिंग, पर्यटकांसाठी वेटिंग रुम, प्राण्यासाठी अद्ययावत आरोग्य केंद्र आदी सुविधा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT