पैठण (छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्यातील औद्योगिक शेतकरी वसाहतीतील उद्योगधंद्यांना दिलासा देणाऱ्या पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे.
मंगळवारी (दि. २९) सहा वाजता येथील धरण नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार पाण्याची आवक १७ हजार २४७ क्युसेक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ८८.६४ टक्के झाल्याची माहिती धरण शाखा उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे. धरणाच्या वरील भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे. वरील भागांतील अनेक छोट्या मोठ्या धरण, बंधारा, नदीतून येथील नाथसागर धरणात पाण्याची आवक झपाट्याने जमा झाली असून, मंगळवारी (दि. २९) सायंकाळी सहा वाजता येथील धरणात ८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.
मंगळवारी (दि. २९) पहाटेपासूनच वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक दिवसभर मोठ्या झपाट्याने वाढत गेली. पाण्याची आवक याच पद्धतीने सुरू राहिल्यास पाणी विसर्ग करण्याच्या नियमानुसार पाटबंधारे विभागाच्या पथकाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी नियोजन करून ठेवले, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.