आरोपीला पकडणारे गुन्हे शाखेचे पथक, खाली बसलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल.  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar temple theft : नर्मदेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; सराईत गुन्हेगार अटकेत

गुन्हे शाखेची कारवाई; कच्ची घाटीतील तलावातून काढली दानपेटी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-५ येथील गुलमोहर कॉलनीतील नर्मदेश्वर मंदिरातून रोख रक्कमेसह दानपेटी पळवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१३) आमखास मैदान परिसरातून बेड्या ठोकल्या. या भामट्याने चोरलेली दानपेटी कच्ची घाटी येथील तलावात फेकून दिली होती, जी पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली असून, या प्रकरणातील त्याचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

अमजद खान सलीम खान (२८, रा. जलाल कॉलनी) असे अटकेतील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर, नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा (रा. कच्ची घाटी) आणि इम्रान खान युनूस खान (रा. कटकटगेट) हे आरोपी फरार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

६ ते ७ जुलैदरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गुलमोहर कॉलनीतील नर्मदेश्वर मंदिरात प्रवेश करून रोख रकमेसह दानपेटी, पितळी समया आणि पितळी नंदादीप चोरून नेला होता. या प्रकरणी शुभम मनोहर भामरे यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, ही चोरी सराईत गुन्हेगार अमजद खान याने त्याच्या दोन साथीदारांसह केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त मझहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक अमोल देशमुख, दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, संदीप तायडे, विलास मुठे, बाळू नागरे, शैलेश आस्कर आणि तातेराव शिंगारे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT