Chhatrapati Sambhajinagar robbery pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar robbery : नांदेडहून रिक्षाने आले, वृद्ध प्रवाशाला लुटले अन् पेट्रोलसाठी मोबाईल विकून पसार झाले

सीसीटीव्हीतून माग काढत गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथून चक्क रिक्षाने छत्रपती संभाजीनगरात येऊन एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करत लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून या लुटारूंचा छडा लावला. प्रशांत चंद्रमुनी हटकर (३५) आणि विलास मारुती इंगोले (४७, दोघेही रा. नांदेड) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. दरम्यान, चोरीचा मोबाईल जप्त केला आला असून, आरोपींनी हा मोबाईल विकून मिळालेल्या पैशांतून रिक्षात पेट्रोल भरून पुन्हा नांदेडला पोबारा केला होता.

फिर्यादी लालचंद देवचंद राजपूत (५८, रा. पुंडलिकनगर) हे २४ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंपावरून क्रांती चौकाकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसले होते. मात्र, वाटेतच रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने (आरोपींनी) राजपूत यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी राजपूत यांना चालत्या रिक्षातून ढकलून दिले आणि पळ काढला.

या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव आणि त्यांचे पथक करत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी रिक्षाचा नंबर (एमएच-२६-एन-५३६४) अस्पष्ट लिहिला होता आणि चोरीनंतर ते एका सरळ मार्गाने न जाता शहरातील विविध मार्गावरून फिरले होते पोलिसांनी अदालत रोड, अहिल्यादेवी होळक चौक, क्रांती चौक, सेव्हनहिल, एमजीएम, सेंट्रल नाका ते रांजणगाव (बजाजनगर) अशा विविध मार्गावरील १०० हून अधिक सीसीटीव्ह कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

त्यातून ही रिक्षा नांदेड परवान्याची असल्याचे आणि तिचा क्रमांक निष्पन्न झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने थे नांदेड गाठून दोघांना बेड्या ठोकल्या. ह कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन् शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव, वरिष्व निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, हवालदार संदी तायडे, कैलास काकड, संतोष पारधे, मनो विखणकर, विजय निकम यांनी केली.

रांजणगावला मुलाकडे मुक्काम

आरोपी प्रशांत हटकर हा नांदेड येथील एका व्यक्तीची रिक्षा भाड्याने चालवत होता. लूटमारीनंतर ते रांजणगाव (बजाजनगर) येथे गेले. तेथे आरोपी विलास इंगोले याचा मुलगा एका कंपनीत कामाला आहे. त्याच्याकडे ते दोन दिवस राहिले. याच मुलामार्फत त्यांनी तो चोरीचा ६ हजारांचा मोबाईल त्याच्या मित्राला अवघ्या २ हजार रुपयांत विकला. या २ हजारांतून त्यांनी रिक्षात पेट्रोल भरले आणि पुन्हा नांदेडला पसार झाले.

स्थानिक साथीदाराचा संशय

आरोपींनी शहरात लूटमार केल्यानंतर ज्या गुंतागुंतीच्या मार्गांनी पळ काढला, ते पाहता त्यांना शहरातील रस्त्यांची चांगली माहिती असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्यासोबत शहरातील एखादा स्थानिक सराईत गुन्हेगार सामील असावा, असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT