'My School is a Beautiful School' campaign from November 3
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान राबवण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे मागील दोन टप्पे (२०२३-२४ व २०२४-२५) अत्यंत यशस्वी ठरले. पहिल्या टप्प्यात सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात ९७,६२८ शाळांनी सहभाग नोंदवला. या यशाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेवरोबरच - आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आणि प्रशासकीय कामकाजातील उत्कृष्टतेला चालना देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
शाळांना सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन गटांत विभागून स्वतंत्र स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रत्येक स्तरावर (तालुका, जिल्हा, विभाग व राज्य) स्वतंत्र मूल्यांकन समित्या नियुक्त करण्यात येतील. पायाभूत सुविधा, शैक्षणिक कामगिरी, शासन धोरणांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित एकूण २०० गुणांची मूल्यांकन प्रणाली ठेवण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, शिक्षकांमध्ये नवोन्मेषाची भावना आणि पालकांमध्ये शाळेविषयी अभिमान वाढीस लागल्याचे शासनाने नमूद केले आहे. यंदाचा तिसरा टप्पा अधिक प्रभावी व प्रगतिशील बनवण्यासाठी काही नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यातील शिक्षणव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श ठरणार आहे.