Murder accused chased and arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहाबाजार परिसरातील भाजीपाला विक्रेता समीर इनायत खान (३०, काचीवाडा) याची रा. तलवारीने गळा चिरून हत्या करणाऱ्या टोळीतील पाचवा फरार आरोपी आसिफ ऊर्फ रायडर हनीब सय्यद (३३, रा. चेलीपुरा, काचीवाडा; ह.मु. छोटा सोनापूर, नागपाडा, मुंबई) याला मुंबईतील नागपाड्यातून जेरबंद केले. रायडरसाठी शहरातील पोलिसांनी दोन दिवस पाळत ठेवून शुक्रवारी (दि.३) मध्यरात्री पाठलाग करून रायडरला जेरबंद केले.
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी समीर खान आणि शाहरूख यांचा शोएब अन्वर खान याच्याशी वाद झाला होता. या वादातून आसिफ ऊर्फ रायडर याने समीरला फोन करून थेट जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी समीरने २९ ऑक्टोबर रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता.
मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चौघांनी तलवारीने गळ्यावर वार करत समीरचा निघृण खून केला. या हत्याकांडानंतर पोलिसांनी शोएब काला, इसरार खान, नसीत इन्ता आणि असलम चाऊस या चौघांना बेड्या ठोकल्या होत्या.
तेव्हापासून धमकी देणारा आसिफ रायडर पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. तो मुंबईतील कामाठीपुऱ्याजवळील छोटा सोनापूर, नागपाडा येथे लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मध्यरात्री पाठलागाचा थरार
येथे रेड लाईट एरिया असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात मोठी गर्दी असायची. अखेर उपनिरीक्षक पाथरकर व पथक मध्यरात्री दीडच्या सुमारास एका टपरीवर चहा घेत असताना आसिफ तिथे आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान या पथकाने त्याचा फिल्मीस्टाईल अंधारात पाठलाग करत त्याला अखेर जेरबंद केले.
नाव बदलून वास्तव्य
मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, योगेश नवसारे, राजेश यदमळ, संजीवनी शिंदे, माया माळी यांच्या पथकाने मुंबई गाठली. रायडरचा या भागात शोध घेतला असता तो अनिस बाबा या नावाने वास्तव्य करत असल्याचे समोर आले. पोलिसांनीही दोन दिवस वेशांतर करून तेथेच मुक्काम ठोकला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.