जवाहरनगर भागातील नाल्यालगतच्या विहिरीवरून पाणी भरताना तर प्रतापनगर नाल्यालगतच्या साठ्यावरून पाणी भरत असलेले खासगी टँकर. (छाया : सचिन लहाने)
छत्रपती संभाजीनगर

Municipal water shortage issue : टँकरचा धंदा तेजीत, तहानलेल्या नागरिकांना नाल्याचे पाणी

प्रतापनगर, उस्मानपुरा, जवाहरनगर, पन्नालालनगरातील नाल्यालगतच्या विहिरीतून उपसा

पुढारी वृत्तसेवा

मुकेश चौधरी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या खासगी टँकरद्वारे नाल्यालगतच्या विहिरींचे दूषित पाणी थेट घराघरांत पोहोचत आहे. काही टँकर चालक हे पाणी भरण्यासाठी अधिकृत जलस्रोतांचा वापर न करता विहिरी, तलाव आणि अगदी नाल्यालगतच्या साठ्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात शहरातील प्रतापनगर, उस्मानपुरा, जवाहारनगर, पन्नालालनगर भागातील नाल्यालगतच्या विहिरीतील दूषित पाणी टँकरमध्ये भरून ते नागरिकांना पुरविले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

उन्हाळा सुरू होताच शहरवासीयांकडून पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. महापालिकेकडून शहरातील काही वसाहतींना सहा ते सात दिवसांआड तर काही भागांना आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यातच जलवाहिनीत बिघाड झाल्यास पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना खासगी टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे. मात्र या टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी दूषित असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.

विशेषतः प्रतापनगर, उस्मानपुरा, जवाहरनगर, पन्नालालनगर परिसरात नाल्यालगत असलेल्या विहिरींमधून टँकरचालक पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. या विहिरींचे पाणी सांडपाणी आणि घाण मिसळल्यामुळे दूषित झाले असून, तेच पाणी नागरिकांना वापरासाठी दिले जात आहे. या भागातून दररोज ८० ते १०० टैंकर भरले जातात.

हे टँकर या विहिरीपासून जवळ असलेल्या उस्मानपुरा, एकनाथनगर, उल्कानगरी, गारखेडा परिसर, शिव-ाजीनगर परिसरासह काही लगतच्या भागांमध्येही हे पाणी पोहोचत आहे. या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वच- ारोग व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

पैसे देऊन विकत घ्यावे लागतात आजार

महापालिकेकडून अपुरे व अनियमीत पाणी मिळत असल्याने नाल्यालगतच्या विहिरीवरून भरल्या जाणाऱ्या टँकरचे दुषित पाणी नाईलाजास्तव नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. खासगी -टँकरच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना पोटाचे विकार, त्वचारोग, तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून, पाण्यासोबत आजारही विकत घ्यावे लागत असल्याची वेळ महापालिकेच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

नागरिकांना दुहेरी आर्थिक भुर्दंड

टँकरचे दरही गगनाला भिडले आहेत. दोन हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ७०० रुपये, तर पाच हजार लिटर टँकरसाठी १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. एका बाजूला पाणीपट्टी भरूनही नियमित पाणी मिळत नसताना, दुसऱ्या बाजूला दूषित पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याने नागरिकांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, आरोग्याचा धोकाही पत्कारावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT