मनपाच्या पाईपलाईनला गळती, हजारो लिटर पाण्याची नासाडी file photo
छत्रपती संभाजीनगर

मनपाच्या पाईपलाईनला गळती, हजारो लिटर पाण्याची नासाडी

गळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : दुचाकी घसरण्याच्या प्रमाणात वाढ

पुढारी वृत्तसेवा

Municipal Pipeline Leaks; Thousands of Liters of Water Wasted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चंपा चौक ते कटकटगेट मार्गावरील रवींद्रनगर डीपीजवळ मनपाच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. या गंभीर प्रकाराकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील अनेक भागांना महापालिकेकडून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहरातील चंपा चौक ते कटकटगेट मार्गावरील रवींद्रनगर डीपी परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान, या पाईपलाईनमधून कटकटगेट परिसरातील हजारो घरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणी सोडताना व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होते.

हे पाणी शहाबाजार दमडी महल परिसरात साचत असून, रस्त्याच्या उतारामुळे सतत वाहत राहते. त्यामुळे रस्ता कायम ओला राहून दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अपुरा पुरवठा, तरीही पाण्याची उधळपट्टी

एकीकडे शहरातील काही भागांना १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे दररोज हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनातील विसंगती स्पष्टपणे दिसून येत आहे.

पाण्याची नासाडी थांबवण्याची मागणी

उन्हाळ्याच्या तीव्रतेत शुद्ध पाण्याची अशी नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली असून, गळतीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी. तसेच अपघातांचा धोका कमी करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT