

Contaminated tanker water directly affects the health of citizens
मुकेश चौधरी
छत्रपतीसंभाजीनगर, महापालिकेकडून होणाऱ्या अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांना पर्याय नसल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र या टँकरद्वारे पुरवठा होणारे पाणीच आता नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. नाल्यालगतच्या विहिरींमधून भरले जाणारे दूषित पाणी थेट घराघरांत पोहोचत असून, त्यामुळे शहरात आरोग्यसंकटाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. शहरातील अनेक नागरिक या पाण्यामुळे होणाऱ्या आज-ारांनी प्रभावित होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील प्रतापनगर, जवाहर कॉलनी, उस्मानपुरा, पन्नालालनगर, मोतीवालानगर, छावणी, रेल्वेस्टेशन परिसर, शहाशाक्ता कॉलनी आणि मुकुंदवाडी या भागांतील अनेक विहिरी नाल्यांच्या अगदी काठावर असल्यामुळे सांडपाण्याचा थेट शिरकाव विहिरींमध्ये होत आहे. त्यामुळे या विहिरींतील पाणी जिवाणू आणि घातक घटकांनी दूषित झालेले असून, कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता ते टँकरद्वारे नागरिकांना पुरवले जात आहे. या दूषित पाण्याच्या वापरामुळे नागरिकांमध्ये विविध आज-ारांचा धोका वाढला आहे.
महापालिकेच्या अपुऱ्या आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळेच टँकर व्यवसाय तेजीत आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा झाला, तर नागरिकांना अशा धोकादायक पर्यायाचा अवलंब करावा लागणार नाही.
सध्या मात्र तहान भागवण्यासाठी नागरिकांना आरोग्याशी तडजोड करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे तहानलेल्या नागरिकांना नाल्याचे पाणी विकत घ्यावे लागत असून, त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यधोक्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. यावर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांना केवळ पाणी नव्हे तर सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत हक्क असून, दूषित पाण्यामुळे आजार वाढत आहेत आणि नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. यावर वेळेत उपाययोजना न झाल्यास हा केवळ पाणीटंचाईचा नव्हे तर मोठ्या सार्वजनिक आरोग्यसंकटाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.