छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभर शहरात राजकीय वातावरण तापले होते. 29 प्रभागांतील 115 जागांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि.16) शहरातील चार ठिकाणी मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये एसएफएस शाळेच्या मैदानावर प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6, 12, 13 आणि 14 या सात प्रभागांची मतमोजणी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मैदानावर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या कार्यकर्त्यांकडून उमेदवारांच्या जयघोषासोबतच गुलालासह हिरवा, निळ्या रंगाचीही उधळण करत धार्मिक घोषणा देण्यात आल्या. या घोषणांचा जल्लोषात कोणताही तणाव निर्माण न होऊ देता, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत शिस्त आणि सौहार्दाचे दर्शन घडवले.
महापालिका निवडणुकीची मतमोजणी ऐकण्यासाठी एसएफएस शाळेच्या मैदानावर सकाळपासूनच शिवसेना, भाजप, एमआयएम तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आपला उमेदवार विजयी होणार, या अपेक्षेने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह संचारलेला होता. मतमोजणीची जसजशी प्रत्येक फेरी पुढे सरकत होती, तसतसा निकालाचा कल स्पष्ट होत होता. त्यानुसार कार्यकर्त्यांचा जल्लोषही वाढत गेला. एखाद्या उमेदवाराने आघाडी घेताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. तसेच गुलालासह हिरवा, निळ्या रंगाचीही उधळण करण्यात येत होती.
लोकशाहीचा उत्सव
विजयी उमेदवारांच्या नावांचे जयघोष, पक्षाच्या घोषणा तसेच काही ठिकाणी धार्मिक घोषणाही ऐकू येत होत्या. मात्र विशेष म्हणजे या घोषणांमुळे कोणताही तणाव निर्माण झाला नाही. कुणीही प्रतिउत्तरात आक्षेपार्ह घोषणा न देता संयम राखला. पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेसोबतच कार्यकर्त्यांनीही सामाजिक भान जपत आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. लोकशाहीच्या उत्सवात आनंद साजरा करतानाही शिस्त आणि सौहार्द जपले जाऊ शकते, याचे सकारात्मक उदाहरण एसएफएस शाळेच्या मैदानावर पाहायला मिळाले.